अमेरिकेने भारतावर लादलेल्या करांना प्रत्युत्तर न देता संयम बाळगून संवाद साधल्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतासह ७५ देशांवरील आयात शुल्कांना स्थगिती दिली आहे. तर, चीनवर कुरघोडी करून १२५ टक्के कर लादण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी निर्यातदारांना आश्वस्त केलं आहे. ते विविध निर्यात प्रोत्साहन परिषदा आणि उद्योग संघटनांच्या भागधारकांच्या बैठकीत बोलत होते.

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी निर्यातदारांना घाबरू नका असे आवाहन केले. त्यांनी आश्वासन दिलं की भारत अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित व्यापार करारात “योग्य मिश्रण आणि योग्य संतुलन” साठी काम करत आहे. कराबाबत वाटाघाटी करण्यासाठी भारतीय पथक योग्य दिशेने वेगाने काम करत आहे. पण यासाठी कोणतीही घाई नसल्याचंही त्यांनी मान्य केलं.

निर्यातदारांनी आशावादी राहावं

“देश सक्रियपणे काम करत आहे आणि राष्ट्रीय हितासाठी उपाय शोधत आहे”, असे आश्वासन पियुष गोयल यांनी निर्यातदारांना दिले. बीटीएवर (Bilateral Trade Agreement) काम करणारी टीम योग्य संतुलनासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यांनी निर्यातदारांना आशावादी राहण्यास आणि सध्याच्या जागतिक वातावरणात चांगल्या बाजूंवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले”, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

इंडियन एक्सप्रेसने गेल्या आठवड्यात वृत्त दिले होते की वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोसोबत भारताच्या द्विपक्षीय व्यापार संबंधांवर देखरेख करणाऱ्या NAFTA विभागाचा विस्तार करून आपले प्रयत्न तीव्र केले आहेत.

अमेरिकेची माघार

जगभरातील ७० देशांमध्ये सरसकट परस्पर आयातशुल्क लादून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितता निर्माण केल्यानंतर दोन दिवसांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपल्या निर्णयावरून घूमजाव केले. बहुसंख्य देशांवरील शुल्काला ९० दिवसांची स्थगिती देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचवेळी चीनवरील आयातशुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवून व्यापारयुद्ध अधिक तीव्र करत असल्याचे संकेत दिले.