जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताच्या सत्तेच्या रणधुमाळीला अखेर बुधवारपासून सुरुवात झाली. लोकसभेच्या ५४३ जागांसह आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओदिशा या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले. तब्बल नऊ टप्प्यांत विभागल्या गेलेल्या निवडणुकीचा पहिला टप्पा ७ एप्रिलपासून सुरू होणार असून १२ मेपर्यंत चालणार आहे. १६ मे रोजी सर्व जागांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी तीन टप्प्यांत मतदान होणार असून मुंबई, ठाणे, कल्याण या भागांत २४ एप्रिल रोजी उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तातडीने अंमलात आली आहे.
वाढवून देण्यात आलेला निवडणूक खर्च, मतदानाची कागदोपत्री नोंद, नकाराधिकार, दहा कोटी नवमतदार अशा विविध कारणांमुळे वैशिष्टय़पूर्ण ठरणारी ही निवडणूक ऐन उन्हाळय़ात देशातील राजकीय वातावरण अधिक तापवणारी ठरणार आहे. भाजपचे नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यातील थेट टक्कर, या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे पाहिले जात असतानाच, तिसरी आघाडी, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष यांनीही या निवडणुकीतील चुरस वाढवली आहे. मात्र, या साऱ्यांच्या केंद्रस्थानी असेल तो सामान्य मतदारच. गेली पाच वर्षे देशात सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कामांचा हिशेब करतानाच, सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी आतूर असलेल्या विरोधकांच्या आश्वासनांचीही चाचपणी मतदारराजाला करावी लागणार आहे. त्यामुळे आजपासूनचे ७० दिवस या मतदारराजाचेच असणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा