करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा अखेर वर्षभरानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत घोषणा केलीय. त्यामुळे आता १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सेवा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचंही नमूद करण्यात आलंय.

दोन दिवसांपूर्वीच नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच पूर्ववत होण्याचे संकेत दिले होते.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा निर्णय कधीपासून?

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवेसंदर्भात केंद्र सरकारने २२ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा बंद केली होती. या स्थगितीची मुदत ३० नोव्हेंपर्यंत वाढवण्यात आली होती. यानुसार ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि १० वर्षांखालील मुलांनी घरातच रहाण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासंदर्भात राज्य सरकारांनी निर्देश जारी करावेत अशी सूचनाही भारत सरकारने केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी क्षेत्राने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी असेही सरकारने म्हटले होते.

दरम्यान, सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी भारताची २५ हून अधिक देशांसोबत ‘एअर बबल’ व्यवस्था आहे. या व्यवस्थेअंतर्गत, दोन देशांमधील विमान कंपन्या काही अटींच्या अधीन राहून एकमेकांच्या भूप्रदेशात विमानांचे संचालन करू शकतात. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सामान्य करण्याच्या प्रक्रियेचे सरकार मूल्यमान करत असल्याचे नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. जगाच्या काही भागांतील करोनाविषयक परिस्थिती लक्षात ठेवून भारत सामान्य परिस्थितीत येऊ इच्छितो, असे ते म्हणाले होते.

Story img Loader