India Haj Quota 2025: भारत सरकारने २०२५ च्या हज यात्रेसाठी हज कोट्यात वाढ करण्यात आल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, सौदी अरेबिया सरकारशी झालेल्या करारानुसार भारताचा हज कोटा यावर्षी १७५,०२५ निश्चित करण्यात आला आहे. भारतीय मुस्लिमांसाठी हज यात्रा सुलभ करण्याला भारत सरकारचे प्राधान्य असल्याचेही, एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय चालू वर्षी हज समितीच्या माध्यमातून मुख्य कोट्याअंतर्गत १२२,५१८ यात्रेकरूंसाठी व्यवस्था करत असल्याचे त्यात म्हटले आहे. सरकारच्या २०२५ च्या हज धोरणानुसार, भारताला देण्यात आलेल्या एकूण हज यात्रेकरूंच्या कोट्यापैकी ७० टक्के कोट्याचे नियोजन भारतीय हज समितीद्वारे करण्यात येणार आहे. तर, उर्वरित कोट्याचे नियोजन खाजगी हज यात्रा गटांकडे असेल. सौदीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उड्डाणे, वाहतूक, मीना कॅम्प, निवास व्यवस्था आणि सेवांसह सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

एकूण कोट्यापैकी ३० टक्के कोटा (सुमारे ५२,५०८ यात्रेकरू) खाजगी एजंट्सना वाटप करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षी २० टक्के इतका होता.

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, “भारत सरकारने सौदी अधिकाऱ्यांशी विविध पातळ्यांवर चर्चा केली, ज्यामध्ये मंत्रीस्तरावरील चर्चेचा देखील समावेश आहे. सौदी हज मंत्रालयाने यात्रेकरूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली, विशेषतः मीना येथे, कारण येथे खूप उष्णता आहे आणि जागा मर्यादित आहे. सौदी सरकारने याबाबत आधीच माहिती दिली असून, मीनाची जागा आधीच व्यापलेली आहे आणि त्यामुळे यावर्षी कोणत्याही देशाला वाढीव कोटा मिळणार नाही.”

पण, भारत सरकारच्या हस्तक्षेपामुळे, सौदी हज मंत्रालयाने मीनामधील सध्याच्या जागेच्या उपलब्धतेनुसार १०,००० यात्रेकरूंची व्यवस्था व्हावी यासाठी खाजगी एजंट्ससाठी (नुसुक) पोर्टल पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. यानंतर मंत्रालयाने कंबाइन्ड हज ग्रुप ऑपरेटर्सना त्यांची प्रक्रिया विलंब न करता तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

याचबरोबर मंत्रालयाने एक्सवरी पोस्टमध्ये असेही सांगितले आहे की, २०१४ मध्ये भारताचा हज कोटा १३६,०२० होता, जो आता २०२५ मध्ये १७५,०२५ पर्यंत वाढला आहे. यामुळे जास्तीत जास्त भारतीय मुस्लिमांना हज यात्रा करण्याची संधी मिळणार आहे.