पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेपाळ भेटीत तेथील विकास प्रकल्पांसाठी १ अब्ज डॉलरचे (१० हजार कोटी नेपाळी रुपये) सवलतीचे कर्ज जाहीर केले. सतरा वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी नेपाळला भेट दिली. यापूर्वी नेपाळला भारताने २.६ कोटी अमेरिकी डॉलरचे सवलतीचे कर्ज भारताच्या एक्झिम बँकेकडून मंजूर केले होते, त्यापेक्षा हे कर्ज स्वतंत्र आहे, असे मोदी यांनी सांगितले.
हे नवीन कर्ज ऊर्जा प्रकल्प व इतर पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महामार्ग, मार्ग व आंतरमार्ग (हायवे, वेज व ट्रान्सवेज) ही नेपाळच्या विकासाची गुरुकिल्ली ठरेल, असे त्यांनी सांगितले
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्यासमवेत मोदी यांनी तीन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात आयोडिन कमतरतेने होणाऱ्या रोगांच्या उच्चाटनासाठी ६.९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. दूरचित्रवाणी सहकार्याबाबतही दोन्ही देशांत करार झाला. मोदी यांचे सकाळी कोईराला यांच्या सिंग दरबार सचिवालयात आगमन झाले. तेव्हा दोन्ही नेत्यांनी शांतता प्रक्रिया, राज्यघटना  मसुदा प्रक्रिया व आर्थिक प्रश्नांवर चर्चा केली. दोन्ही देशांतील संबंधांवरही त्यांनी चर्चा केली. नेपाळमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. त्यामुळे त्याचा वापर प्रगतीसाठी करता येईल. पर्यटनातूनही नेपाळला अर्थार्जन होऊ शकेल असे सांगून मोदी म्हणाले, की सारे जग एक लोकशाही देश म्हणून नेपाळकडे आशेने पाहत आहे.