भारताकडे आज डबल एआयची शक्ती आहे. एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरं म्हणजे अॅस्पिरेशनल इंडिया. खरं तर भारतासाठी एआय हे केवळ तंत्रज्ञान नाही, तरुणांच्या प्रगतीसाठी मोठी संधी आहे, असं मत पंतप्रधान मोदी यांनी मांडलं आहे. तसेच तंत्रज्ञान हे कुणावर नियंत्रण मिळवण्याचं किंवा विभाजन करण्याचं नाही, तर पारदर्शकता आणि सक्षमीकरणाचे साधन आहे, असेही ते म्हणाले. दिल्लीत झालेल्या एनडीटीव्ही वर्ल्ड समिटला संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
“भारताकडे आज डबल एआयची शक्ती आहे. एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसरं म्हणजे अॅस्पिरेशनल इंडिया. खरं तर एआय हे केवळ तंत्रज्ञान नाही, तरुणांच्या प्रगतीसाठी मोठी संधी आहे. भारताने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करून जगाला डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा नवा मार्ग दाखवला आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.
“भारत कोणालाही गृहीत धरून नातं निर्माण करत नाही”
“डिजिटल इनोव्हेशन आणि लोकशाही मूल्ये एकत्र राहू शकतात, हे भारताने जगाला दाखवून दिलं आहे. तंत्रज्ञान कुणावर नियंत्रण मिळवण्याचे किंवा विभाजन करण्याचं नाही, तर पारदर्शकता आणि सक्षमीकरणाचे साधन आहे. भारत कोणालाही गृहीत धरून नातं निर्माण करत नाही. आमचे नातं हे विश्वासावर आधारित आहे. जगालाही आता ही गोष्ट समजली आहे”, असेही ते म्हणाले.
“१४० कोटी जनतेने देशाच्या विकासाचा संकल्प केला आहे”
पुढे बोलताना, “भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. या तरुणांमध्ये असलेली क्षमता देशाला नव्या उंचीवर नेऊ शकते. भारत आज एक उदयोन्मुख शक्ती आहे. आज देशापुढे गरिबीचं मोठं आव्हान आहे. मात्र, या आव्हानांचा सामना कसा करायचा, हेदेखील आपल्याला माहिती आहे. देशाच्या १४० कोटी जनतेने देशाच्या विकासाचा संकल्प केला आहे. आज जनता सरकार चालवत आहेत. ही लोकसहभागाची एक मोठी चळवळ बनली आहे”, असेही त्यांनी नमूद केलं.