पंतप्रधान नवाझ शरीफ यांची माहिती
भारताने पठाणकोट हल्ल्याबाबत आणखी पुरावे दिले आहेत व पाकिस्तान हल्लेखोरांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सांगितले. दहशतवादाविरोधात मुकाबला करणे गरजेचे आहे हे सांगतानाच त्यांनी त्यात फारशी प्रगती झाली नसल्याचे मान्य केले.
पठाणकोट दहशतवादी हल्ला हा भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांची दुसरी मोठी अक्षम्य घटना आहे, असे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी अलीकडेच म्हटले होते. जैश ए महंमद या संघटनेने पठाणकोट येथे केलेल्या हल्ल्यात १ ते २ जानेवारी दरम्यान सात भारतीय जवान हुतात्मा झाले होते.
शरीफ यांनी सांगितले की, आम्हाला पठाणकोट हल्ल्याबाबत भारताने नवीन माहिती दिली आहे, ते पुरावे आम्ही तपासून पाहात आहोत, आम्ही ही गोष्ट लपवू शकलो असतो पण पुरावे मिळाले असून त्यावर चौकशी केली जाईल. दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी हीच एक संधी आहे असे पाकिस्तान मानतो. आम्ही भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे चौकशी पुढे नेऊ त्यासाठी विशेष चौकशी पथकही स्थापन करण्यात आले आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहोत व याबाबत तपासात शक्य तितकी मदत करण्यात येईल. हा हल्ला करण्यात सामील असलेल्यांना शिक्षा केली जाईल.पाकिस्तानचे चौकशी पथक भारतात भेट देणार असून आणखी माहिती घेणार आहे. पाकिस्तान व भारत यांनी एकमेकांच्या कामकाजात हस्तक्षेप मात्र करता कामा नये. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासीर खान जानजुआ यांनी ५ जानेवारीला त्यांचे समपदस्थ अजित डोव्हल यांना दूरध्वनी केला होता. त्यात त्यांनी पठाणकोट हल्ल्याच्या तपासावर चर्चा केली तसेच नेमके हल्लेखोर किती होते, त्यांचे नेमके काय बोलणे झाले या मुद्दय़ांचा समावेश होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा