नवी दिल्ली : उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘क्यू एस वल्र्ड युनिव्हर्सिटी रँकिंग-एशिया’ यादीत यंदा प्रथमच सर्वाधिक भारतीय संस्थांनी स्थान मिळविले आहे. भारतातील १४८ संस्थांचा यादीत समावेश झाला असून चीनच्या १३३ संस्था आहेत. आशियामध्ये ४०व्या क्रमांकासह मुंबई आयआयटीने देशातील अव्वल नंबर कायम राखला आहे.
हेही वाचा >>> दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आता कृत्रिम पाऊस? जाणून घ्या सविस्तर…
२०२४च्या क्यू एस मानांकनामध्ये चीनमधील पेकिंग विद्यापीठ आशियातील सर्वोत्तम विद्यापीठ ठरले असून हाँगकाँग विद्यापीठ दुसऱ्या, तर सिंगापूरमधील राष्ट्रीय विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे. मात्र या यादीत यंदा तब्बल ३७ भारतीय शिक्षणसंस्थांनी नव्याने प्रवेश केला आहे. चीनखालोखाल जपानच्या ९६ संस्था असून म्यानमार, कंबोडिया आणि नेपाळमधील विद्यापीठांचा या यादीत प्रथमच समावेश झाला आहे. मुंबईसह दिल्ली, मद्रास, खडकपूर व कानपूर आयआयटी, आयआयएसी बंगळूरु व दिल्ली विद्यापीठाने पहिल्या १०० संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. क्यू एस मानांकनामध्ये भारतीय विद्यापीठांची संख्या सर्वाधिक होणे हे भारतातील उच्च शिक्षणामधील विकासाचे द्योतक असल्याचे क्यू एचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेन सॉटर यांनी म्हटले आहे.
संशोधन क्षेत्राची वाढ आव्हानात्मक
संशोधनातील आंतरराष्ट्रीय निर्देशंकामध्ये भारताचे गुण १५.४ असून १८.८च्या विभागीय सरासरीपेक्षा ते कमी असल्याचे क्यू एस मानांकन यादीतून स्पष्ट झाले आहे. भारतीय शिक्षण संस्थांची दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिले म्हणजे मोठय़ा संख्येने असलेल्या देशांतर्गत विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे त्याच वेळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनाही आकर्षित करणे महत्त्वाचे आहे. जागतिक कल बघून या दोन्हीमध्ये समतोल साधणे आव्हानात्मक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.