भारतासोबत शस्त्र संधीचा करार झालेला असतानाही पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार त्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणारी ही आगळीक अस्वीकारार्ह असून त्यांची अरेरावी न थांबल्यास भारताला याप्रकरणी पूर्णपणे नव्याने वेगळा पर्याय शोधावा लागेल, अशा शब्दात भारतीय वायू दलाचे प्रमुख मार्शल एन ए के ब्राऊन यांनी शनिवारी पाकिस्तानला सुनावले.
दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे, दोन्ही देशांमध्ये शस्रसंधीचा महत्वपूर्ण करार झालेला आहे. दोन्ही देशांनी त्याचे पालन करण्याचे बंधनकारक असताना पाकिस्तानकडून गेल्या काही महिन्यात सीमारेषेवर सुरु असलेली आगळीक सहन करण्यापलीकडची आहे.
 पाक सैन्याकडून सध्या सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर आम्ही पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.
पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीत घुसून दोन भारतीय जवानांची निघृण हत्या केल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत सरकारने कोणती भूमिका घ्यावी, याबाबत ब्राऊन यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, या मुद्दय़ाला सरकारच्या दिशेने वळवू नये, विकल्प हे विकल्पच असतात. त्याबाबत उघडपणे चर्चा केली जात नाही. पाकिस्तानची अरेरावी सुरूच राहिली तर या प्रकरणाकडे संपूर्णपणे नव्याने पाहावे लागेल, असे ब्राऊन म्हणाले. दरम्यान, भारतीय सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये पुढच्या महिन्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.सर्वसाधारण सीमाभागातील बैठक १६ जानेवारी रोजी  होणार होती. मात्र आता बैठक २० फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Story img Loader