देशातील अनेक बँकांचे ९ हजार कोटींहून अधिक रकमेचे कर्ज बुडवणारे उद्योगपती विजय मल्या यांना भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटन सरकराला पत्र लिहिले आहे. परराष्ट्र मंत्रालयानेच या संदर्भात माहिती दिली. विजय मल्या यांना भारतात परत आणण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणूनच हे पत्र ब्रिटन सरकारला पाठविण्यात आले आहे.
India has written to UK on deportation of Vijay Mallya: MEA.
— Press Trust of India (@PTI_News) April 28, 2016
काही दिवसांपूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाने मल्या यांचा पासपोर्ट रद्द केला होता. मल्या यांची किंगफिशर विमान कंपनीही यापूर्वीच बंद पडली आहे. आयडीबीआय बँकेचे ९०० कोटींचे कर्ज मल्या यांनी बुडवले आहे. मल्या यांच्यावर मुंबई येथील विशेष न्यायाधीशांनी पीएमएलए कायदा २००२ अनुसार अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. मंत्रालयाने मल्या यांना देशात आणण्यासाठी कायदा तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू केली होती. मल्या सध्या ब्रिटनमध्ये असून २ मार्चला तेथे गेले आहेत. त्यांनी सक्तवसुली संचालनालयासमोर उपस्थित राहण्यास नकार दिला असल्याने त्याचा पासपोर्ट रद्द होणार हे जवळपास निश्चित होते, त्यानंतर १५ एप्रिलला सक्तवसुली संचालनालयाने दिलेल्या प्रस्तावानुसार मल्या यांचा पासपोर्ट निलंबित करण्यात आला होता. त्यानंतर तो रद्द करण्यात आला आहे.