भारताचे जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तान हेच दहशतवाद्यांचे केंद्र
नवी दिल्ली : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला भारताने शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. या अभद्र टीकेद्वारे पाकिस्तानने नवी नीचतम पातळी गाठल्याची कठोर टीका भारताने केली.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांत विविध दहशतवादी गटांना पाकिस्तानचा पाठिंबा अधोरेखित केला व ‘दहशतवादाचे केंद्र’ असे पाकिस्तानचे नाव न घेता वर्णन केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक हल्ला चढवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती.
न्यूयॉर्कमध्ये भुट्टो यांनी केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांची उद्विग्नता ही दहशतवादाला देशाच्या धोरणाचा भाग बनवणाऱ्या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या मुख्य सूत्रधारांवर काढायला हवी होती. पाकिस्तान हा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ‘हुतात्मा’ म्हणून गौरवतो. तसेच लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम सारख्या कुख्यात दहशतवाद्यांना आश्रय देतो. पाकिस्तानशिवाय इतर कोणताही देश संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेले १२६ दहशतवादी, २७ दहशतवादी गट आपल्याकडे असल्याचा अभिमान बाळगूच शकत नाही.
बागची म्हणाले की, दहशतवाद्यांचा व छुप्या युद्धाच्या साधनांचा वापर करण्यास पाकिस्तानच्या वाढत्या अपयशामुळेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री असा ‘असभ्य आक्रोश’ करत आहेत.
जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले, की ‘दहशतवादाचे समकालीन केंद्र’ खूप सक्रिय आहे. त्याचा सामना करण्यासाठी सामूहिक कृती करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
त्यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पत्रकारांना सांगितले, की जग पाकिस्तानकडे ‘दहशतवादाचे केंद्र’ म्हणून पाहते. त्यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या २०११ मध्ये भारताच्या शेजारी देशाबाबत केलेल्या विधानाचाही पुनरुच्चार केला. हिलरी म्हणाल्या होत्या, की जे अंगणात साप पाळतात, एके दिवशी त्यांना हे साप दंश करतील.
‘पाकिस्तान १६ डिसेंबर १९७१ विसरले!’
बागची म्हणाले, की ही टीका पाकिस्तानने गाठलेली नवी नीचतम पातळी आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बहुधा १९७१ मधील १६ डिसेंबर हा दिवस विसरले. जो पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी केलेल्या बंगाली आणि हिंदूंच्या नरसंहाराचा थेट परिणाम म्हणून उगवला होता. दुर्दैवाने असे दिसते की एवढे घडूनही पाकिस्तानने अल्पसंख्याकांशी आपल्या वागणुकीत फारसा बदल केलेला नाही. तसेच भारतावर आक्षेप घेण्याइतपत पाकिस्तानची विश्वासार्हता नक्कीच नाही. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानवर भारताने मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली होती.
‘वेगळी अपेक्षा काय करणार?’
परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारींना सुनावले, की सामान्यत: कोणत्याही सार्वभौम देशाचा परराष्ट्रमंत्री असे बोलत नाही. पण पाकिस्तानकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? याच लोकांनी बलुचिस्तानमध्ये नागरिकांची हत्या केली आहे. काश्मीरच्या निष्पाप नागरिकांना मारले आहे.