United Nations General Assembly India Reply: संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ७९ व्या सत्रात पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताच्या विरोधात गरळ ओकली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतात इस्लामोफोबिया वाढल्याचे सांगितले. यावर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी भारताकडून पाकिस्तानच्या आगळीकीला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन म्हणाल्या की, जो देश लष्कराकडून चालविला जातो. ज्यांना जागतिक पातळीवर दहशतवाद, अंमली पदार्थांचा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसाठी ओळखले जाते, त्या देशाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.

भाविका मंगलानंदन पुढे म्हणाल्या, “आज या महासभेत खेदजनक बाब घडली असून आपण त्याचे साक्षीदार आहोत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताचा उल्लेख केला, त्याबद्दल मी बोलत आहे. पाकिस्तान आपल्या शेजारी देशाच्या विरोधात सीमे पलीकडून दहशतवादाचा वापर करत आहे, हे जागाला माहिती आहे. त्यांनी आमच्या संसदेवर, आर्थिक राजधानी मुंबईवर, बाजार आणि तीर्थयात्रेच्या मार्गावर हल्ले केले. ही यादी बरीच मोठी आहे. अशा देशाने हिंसाचारावर बोलणे म्हणजे यापेक्षा मोठे दांभिकतेचे उदाहरण असू शकत नाही.”

खरे सांगायचे तर पाकिस्तानला भारतीय भूभाग बळकविण्याची इच्छा आहे. त्यामुळेच भारताचा विभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने होत असलेल्या निवडणुकांमध्ये दहशतवादाचा वापर करून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही भाविका मंगलानंदन म्हणाल्या. पुढे पाकिस्तानला इशारा देताना त्यांनी म्हटले की, शेजारी देशाने हेही लक्षात घेतले पाहीजे की, भारताविरुद्ध सीमेपलीकडून होणारा दहशतवाद हा अपरिहार्य परिणामांना आमंत्रण देईल.

शाहबाज शरीफ काय म्हणाले होते?

संयुक्त राष्ट्राच्या ७९व्या महासभेत बोलत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून अनुच्छेद ३७० हटविल्याकडे लक्ष वळविल. तसेच हिजबुलचा कमांडर बुराहान वानीच्या मृत्यूचा विषय उपस्थित केला. २० मिनिटांच्या भाषणात शरीफ यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा अनुच्छेद ३७० लागू करून शांतता प्रस्थापित करावी, असे सांगितले.

काश्मीरी जनतेच्या इच्छेनुसार आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा ठरवानुसार भारताने जम्मू आणि काश्मीरच्या समस्येवर शांततापूर्ण चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही शरीफ म्हणाले.

पॅलेस्टिनी आणि काश्मीरी लोक हे एकसारखेच असल्याचे सांगताना शरीफ म्हणाले की, पॅलेस्टाईनमधील जनता आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांमध्ये काहीही फरक नाही. दोन्हीकडील नागरिक हे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत.

भारतात इस्लामोफोबियामध्ये वाढ

शाहबाज शरीफ पुढे म्हणाले की, भारतात मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. तसेच इस्लामोफोबियामध्येही वाढ होत असून ही जगासाठी एक त्रासदायक बाब ठरत आहे. भारतात हिंदू वर्चस्ववादाचा अजेंड राबविला जात असून इस्लामोफोबियाचे हे सर्वात भयानक असे उदाहरण आहे. भारतातील २० कोटी मुस्लिमांना दमन करण्यात येत असून इस्लामिक वारसा नष्ट करण्याचा आक्रमक प्रयत्न होत आहे.