जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील अप्पर डांगरी येथे नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत असताना, अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली आहे.
राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. राजौरी पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या अप्पर डांगरी येथे रविवारी ( १ जानेवारी ) संध्याकाळी दहशतवाद्यांनी हिंदू समुदायाच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर राजौरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तीन जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सतीश कुमार, दीपक कुमार आणि प्रीतम लाल यांचा समावेश आहे. तर, एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. तसेच, शिशू पाल, पवन कुमार, रोहित पंडित, सरोज बाला, रिधम शर्मा आणि पवन कुमार अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना विमानाद्वारे जम्मूत नेण्यात आलं आहे.
यावर प्रतिक्रिया देताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, “काश्मीरसह भारत एक धर्मनिरपेक्ष ठिकाण आहे, मात्र ही गोष्ट वेगळी आहे की आता याला गोडसेचा देश बनवलं जात आहे. केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक नागरिकाची हत्या जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान आहे. अशाप्रकारच्या हल्ल्यांमुळे एक विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होत आहे.”
याशिवाय महबूबा मुफ्तींनी घटनेबद्दलम्हटले की, “ही एक हृदयद्रावक घटना आहे आणि त्या कुटुंबीयाचे मोठे नुकसान आहे. ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, ईश्वर त्यांना शक्ती देवो. अशा घटनांमध्ये एकाच पक्षाला हिंदू आणि मुस्लीम मुद्य्यांचा फायदा होतो, त्यांना देशात द्वेष पसरवण्याची संधी मिळते.” असंही मुफ्तींनी म्हटलं आहे.
याचबरोबर, “जम्मू-काश्मीरचे लोक बंदुकांमध्ये अडकले आहेत. राजौरी सारखे हल्ले आणि गैरमुस्लिमांच्या हत्यांमुळे देशात एका विशिष्ट पक्षाला फायदा होत आहे. हा तो पक्ष आहे, जो लोकांचे विभाजन करतो आणि धर्माच्या नावावर द्वेष निर्माण करतो.”
या हल्ल्यात तीन जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला . त्यामध्ये सतीश कुमार, दीपक कुमार आणि प्रीतम लाल यांचा समावेश आहे. तर, एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. तसेच, शिशू पाल, पवन कुमार, रोहित पंडित, सरोज बाला, रिधम शर्मा आणि पवन कुमार अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना विमानाद्वारे जम्मूत नेण्यात आलं आहे.