* मनमोहन सिंग ‘नाइट वॉचमन’
*  नरेंद्र मोदींचा चौफेर हल्ला
केवळ गांधी कुटुंबीयांचे हित जपण्यासाठी काँग्रेसकडून राष्ट्रहितालाच तिलांजली दिली जात आहे, या शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे काँग्रेसवर चौफेर टीकेची तोफ डागली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना म्हणूनच काँग्रेसने केवळ ‘नाइट वॉचमन’ म्हणून नेमले आहे. काँग्रेसचे सरकार ही देशाला लागलेली वाळवी आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी प्रकाशात आल्यानंतर त्यांचे आकर्षण वाढले असून तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या भाजपच्या बैठकीत मोदी हेच आकर्षणाचे केंद्र ठरले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेप्रमाणेच मोदी यांच्या भाषणाला रंग चढला होता.
गुजरातमधील उत्तम प्रशासनाच्या मुद्दय़ावर प्रारंभी मोदी बोलणार होते, परंतु तसे न करता राष्ट्रीय सुरक्षा, सरकारी कारभार आणि भ्रष्टाचारावर काँग्रेसची भूमिका या विषयावर त्यांनी आपल्या तासभराच्या तडाखेबंद भाषणात काँग्रेसवर एकूणच कोरडे ओढले.
प्रत्येक गोष्टीत कमिशनचाच विचार करणारे केंद्रातील काँग्रेसचे सरकार एखाद्या वाळवीसारखे आपल्या देशाला पोखरून काढत आहे आणि एकाच कुटुंबाच्या हितासाठी देशाच्या हिताला तिलांजली देण्याची काँग्रेसची परंपरा आहे, असा जबरदस्त हल्ला मोदी यांनी केला. गांधी कुटुंबातील व्यक्तीसाठी पंतप्रधानपदाची खुर्ची शाबूत राहावी म्हणूनच काँग्रेसने पंतप्रधानांना एखाद्या ‘नाइट वॉचमन’सारखे नियुक्त केले आहे, असे मोदी यांनी मनमोहन सिंग यांचा नामोल्लेख टाळून नमूद केले.  तुमच्या घरास वाळवी लागली तर तिचा नि:पात करणे कठीण जाते. एखाद्या ठिकाणाहून वाळवीला हटविले की ती दुसरीकडे वाढते. काँग्रेसचे तसेच असून या वाळवीला हटवायचे असेल तर भाजप कार्यकर्त्यांच्या घामरूपी औषधानेच हटवावे लागेल आणि हा घामच देशाला काँग्रेसरूपी वाळवीपासून वाचवू शकेल, अशी बोचरी टीका मोदी यांनी केली. मोदी यांच्या या तडाखेबंद भाषणाला सर्वाचा जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर खरेदीतील भ्रष्टाचार, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा आदी मुद्दय़ांवरूनही मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तुलनेची आता वेळ आली आहे. ‘भाजप हे मिशनसाठी आहे, तर काँग्रेस केवळ कमिशनसाठीच असते,’ असा टोमणा त्यांनी मारला. मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसमधील अंतर्गत सत्तास्पर्धेवरूनही चिमटे काढले. खरे म्हणजे प्रणब मुखर्जी हे पंतप्रधानपदासाठी अत्यंत लायक उमेदवार असताना काँग्रेसने त्यांच्याऐवजी मनमोहन सिंग यांची निवड केली, कारण मुखर्जी हे पंतप्रधान म्हणून यशस्वी ठरले असते तर (गांधी) कुटुंबाचे काय झाले असते, हा प्रश्न काँग्रेससमोर होता, असा टोमणा मोदी यांनी मारला.
भाजपचा पंतप्रधानपदाचा आगामी उमेदवार कोण, हा प्रश्न तितकासा महत्त्वाचा नाही. कोण कार्यकर्ता, कोण नेता याला भाजपमध्ये महत्त्व नाही. आपले लक्ष्य महत्त्वाचे असून लोकांना नाराज करण्याचा आपल्याला कसलाही अधिकार नाही.    – नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, गुजरात

Story img Loader