Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी भारतातील युपीआय (UPI) प्रणालीचं कौतुक केलं आहे. तसेच भारताच्या विकासाबाबत बोलताना भारत खरोखर अपेक्षेपेक्षा वेगाने पुढे जात असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. एआयचा अग्रगण्य वापर, प्रगत शेती, जैविक खते, उत्तम बियाणे अशा विविध समस्यांना देशांतर्गत मदत करणाऱ्या नावीन्यपूर्णतेसाठी भारत हे नवनिर्मितीचं महत्त्वाचं केंद्र बनत आहे, असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

मुंबईत एक्सप्रेस अड्डा या इंडियन एक्स्प्रेसच्या विशेष कार्यक्रमात गुरुवारी बिल गेट्स यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भारतातील विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. भारताकडून अधिकाधिक नावीन्यपूर्ण संकल्पना येत आहेत, हे अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने पुढे जात असल्याचा मला आनंद आहे, असंही बिल गेट्स यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच पुढील १५ वर्षांत भारताकडून विकासासाठी पुरेशी आर्थिक मदत अपेक्षित असल्याचं म्हणत त्यांनी देशांच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षमतेवर भर दिला.

हवामान बदलाशी लढण्यासाठीच्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्याबाबतीत विकसनशील देश खूप चांगलं काम करत आहेत हे पाहून आश्चर्य वाटतं का? असा प्रश्न विचारला असता बिल गेट्स यांनी म्हटलं की, जागतिक तापमानवाढीशी लढण्यासाठी फारसे देश वचनबद्ध नाहीत. खरं तर अलिकडच्या काळात अधिक ऊर्जा पुरवणं आणि तापमान कमी करणं ही उद्दिष्टे एकमेकांशी संघर्षात आली आहेत.

भारत २०३० पर्यंत ५० टक्के ऊर्जा नैसर्गिक स्रोतांद्वारे पुरवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. हे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. यावर बिल गेट्स यांनी म्हटलं की, विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. तसेच ऊर्जा क्षेत्र अनुकूल स्थितीत आहे, कारण भारत या क्षेत्रात प्रगती करत आहे. चीन उर्जेच्या क्षेत्रात जागतिक आघाडीवर आहे. तसेच भारत निश्चितपणे त्यानंतर दुसरा असेल. भारताकडे आता स्वस्त सौर पॅनेल आणि बॅटरीसाठी ब्लू प्रिंट आहे, ज्याचे अनुसरण करू शकते किंवा त्यांच्याशी स्पर्धा करू शकते. एआय क्षेत्रातील वाढीमुळे आणि ग्लोबल साउथच्या वाढत्या आकांक्षांमुळे ऊर्जेची मागणी वाढत असल्याने जगाला काही आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं.

तसेच बिल गेट्स यांनी असंही म्हटलं की चीन आणि यूएस दरम्यान चालू असलेल्या तणावामुळे व्यापारात अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच मदत कमी करून विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात अमेरिकेची कमी होत चाललेली भूमिका अधोरेखित करताना भारत ही भूमिका पूर्ण करू शकेल का? असं विचारलं असता बिल गेट्स म्हणाले की, पुढील १५ वर्षात भारताकडून विकासासाठी भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा असल्याचं सांगत देशातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची क्षमता त्यांनी अधोरेखित केली.

“इतर देशांना मदत करण्याच्या भारताच्या भूमिकेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा. कारण बँकिंग किंवा सरकारी लाभ हस्तांतरित करण्याकडे पाहिलं तरी ही एक अद्भुत गोष्ट आहे. ते म्हणाले की यामुळे स्टार्ट-अप्सच्या परिसंस्थेला भरभराटीसाठी पाया मिळाला आहे. भारत एक नवनिर्मितीचं महत्त्वाचे केंद्र बनेल अशी आशा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा अग्रगण्य वापर, प्रगत शेती, जैविक खते, चांगले बियाणे, प्राण्यांचे अनुवंशशास्त्र या सर्व समस्यांना देशांतर्गत मदत करणाऱ्या नवोपक्रमाचा भारत एक महत्त्वाचा स्रोत ठरणार असल्याचं दिसून येत आहे”, असंही बिल गेट्स म्हणाले.

Story img Loader