आपल्या वादग्रस्त विधानांमुळे याआधीच चर्चेत आलेले आणि अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीतील महत्त्वाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या वाटचालीचे कौतुक केले. ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताचं चांगल चाललं आहे, पण त्याबद्दल कोणी बोलत नाही, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे सध्या आघाडीवर आहेत. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सुरुवात केल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भारताबद्दलचे आपले मत उघडपणे मांडले. मुलाखतीमध्ये आपली भूमिका मांडत असताना भारताचा संदर्भ आल्यावर त्यांनी भारताचं खूप चांगल चालल असल्याचे सांगितले. पण त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही, असे सांगितले.
यापूर्वी केलेल्या भाषणांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे चीन, मेक्सिको, जपान या देशांविरोधात भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारताबद्दल व्यक्त केलेल्या मतामुळे काहीसे आश्चर्यही व्यक्त करण्यात येते आहे.

Story img Loader