देशात वेळोवेळी घडणाऱ्या घटनांवरून देशातील धर्मनिरपेक्षता किंवा लोकशाही तत्व धोक्यात आल्याची भिती व्यक्त केली जाते. मात्र, देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मात्र असं काहीही नसून भारत हा जगातला सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाश्चात्य माध्यमांकडून भारताची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात असल्याची टीका देखील केली. तसेच, त्यांना इंडायजेशन झाल्याचा टोमणा देखील मारला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भारताची प्रगती त्यांना सहन होत नाही”

यावेळी व्यंकय्या नायडू यांनी बोलताना विदेशी माध्यमांना भारताचा विकास पचत नसल्याचा टोला लगावला. “सध्या हा ट्रेंड दिसतोयय. विशेषत: पाश्चात्य माध्यमांमध्ये हा ट्रेंड दिसतोय. भारताची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यांना हे सहन होत नाही की भारत प्रगती करतोय, भारताला जागतिक स्तरावर विश्वगुरू म्हणून सन्मान मिळतोय. त्यामुळे भारताची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडली जाते. त्यांना इंडायजेशनचा त्रास होत असावा”, असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

काही अपवादात्मक घटना आहेत, पण…

“अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता या मुद्द्यांवरून ते भारतावर टीका करत आहेत. पण माझ्या अभ्यासानुसार भारत हा जगभरात सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश आहे. असा दुसरा कोणताही देश नाही. इथे जात, धर्म, लिंग, प्रदेश यावरून भेदभाव होत नाही. त्या सगळ्यांचा सन्मान होतो. काही अपवादात्मक घटना आहेत. पण एक देश म्हणून आपण धर्मनिरपेक्ष आहोत. कारण भारतात धर्मनिरपेक्षता ही भारतीयांच्या रक्तात, नसानसांत आहे. ही फक्त एखाद्या सरकारमुळे नाही. ती भारतीय जनतेमुळे आहे”, असं उपराष्ट्रपती म्हणाले आहेत.

सर्व नागरिकांना समान अधिकार

दरम्यान, देशातील लोकशाहीमुळे सर्व नागरिकांना समान अधिकार मिळत असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले. “या देशातील लोकशाही व्यवस्थेमुळे सर्वांना समान अधिकार आणि समान न्याय या राज्यघटनेच्या तत्वाची निश्चिती होते”, असं देखील नायडू म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India is most secular country vice president venkaiah naidu praised pmw
Show comments