Shortage Of Talented Employees In India : भारतातील विविध क्षेत्रातील कंपन्यांना गेल्या काही वर्षांपासून प्रतिभावन कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. कारण या कंपन्यांनापैकी ८० टक्के कंपन्यांना कुशल कर्मचारी शोधण्यात अडचणी येत आहेत. दुसरीकडे जागतिक पातळीवर ७४ टक्के कंपन्या कुशल कर्मचारी शोधण्यासाठी झगडत आहेत. मॅनपॉवर ग्रुप द्वारे करण्यात आलेल्या ग्लोबल टॅलेंट शॉर्टेज सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आयटी आणि आरोग्य क्षेत्रासमोर आव्हाने
आयटी, ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांना विशेष कौशल्यांची गरज असते, त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना कुशल कर्मचारी मिळेना झाले आहेत. अकुशल कर्मचाऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी, अनेक कंपन्या अंतर्गत प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहेत. यातील ३९ टक्के कंपन्या सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कौशल्य विकास आणि पुनर्कौशल्य विकासाचे विकासाचे प्रशिक्षण देत आहेत.
“२०२५ मध्ये ८० टक्के कंपन्यांना कुशल कर्मचारी शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सतत निर्माण होत असलेल्या कुशल कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे, यावर उपाय शोधण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे,” असे मॅनपॉवर ग्रुप इंडिया आणि वेस्ट एशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी यांनी सांगितले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) स्वीकारण्याचे आव्हान
प्रतिभेच्या कमतरतेमध्ये प्रादेशिक असमानताही दिसून आली आहे. दक्षिण भारतात कार्यरत असलेल्या ८५ टक्के कंपन्यांना कुशल कर्मचारी शोधण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या सर्वेक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) स्वीकारण्याच्या गुंतागुंतींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. कंपन्यांना एआय कुशल कर्मचारी शोधणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि कामचे ठिकाण (हायब्रिड किंवा रिमोट वर्क) या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
बहुआयामी दृष्टिकोनाची गरज
भारतातील या अकुशल कर्मचाऱ्यांच्या समस्येला तोंड देण्यासाठी कंपन्यांना बहुआयामी दृष्टिकोनाची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी कंपन्यांना कर्मचारी विकास, प्रतिभावान उमेदवार शोधणे आणि नाविन्यपूर्ण भरती धोरणे स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे.