भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने आयआरएनएसएस १ डी हा उपग्रह यशस्वी रीत्या अवकाशात सोडला असून आता त्यामुळे अमेरिकेच्या ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’ सारखी स्वदेशी दिशादर्शन प्रणाली लवकरच उपलब्ध होणार आहे.
   भारताने आतापर्यंत दिशादर्शन प्रणाली विकसित करण्यासाठी तीन उपग्रह सोडले होते. आता चौथा यशस्वी रीत्या सोडण्यात आला असून चार उपग्रह दिशादर्शन प्रणालीसाठी पुरेसे असतात. आयआरएनएसएस १ डी हा उपग्रह पीएसएलव्ही सी २७ या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आला. या उपग्रहाच्या उड्डाणासाठी ५९.५ तासांची उलटगणती पूर्ण झाली असून त्यानंतर पीएसएलव्ही-सी २७ हा प्रक्षेपक उपग्रहासह अवकाशात झेपावला.    सायंकाळी ५ वाजून १९ मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रावरून हा उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने झेपावला. २१ मिनिटांनी तो कक्षेत गेला.
    भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष ए.एस. किरणकुमार यांनी सांगितले, की आपण इस्रोच्या या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत करतो. दिशादर्शन प्रणालीतील हा चौथा उपग्रह आहे. पीएसएलव्हीच्या या उड्डाणात ९ मार्चला काही अडचणी आल्या होत्या, त्यामुळे उपग्रहाचे उड्डाण लांबले होते ते अखेर यशस्वी पार पडले आहे.
भारतीय प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणालीत एकूण सात उपग्रह सोडण्यात येणार असून त्यातील हा चौथा उपग्रह होता, असे सांगून प्रकल्प संचालक पी कुन्हीकृष्णन यांनी सांगितले, की  या प्रणालीसाठी किमान चार उपग्रहांची आवश्यकता असते ती आता पूर्ण झाली आहे.
आतापर्यंत चांद्रयान १ जीसॅट १२, रिसॅट-१, आयआरएनएसएस १ ए, मार्स आर्बिटर स्पेसक्राफ्ट, आयआरएसएनएस-१ बी, आयआरएनएसएस १ सी यांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात पीएसएलव्ही सी २७ च्या सुधारित आवृत्तीचा मोठा वाटा होता. संपूर्ण आयआरएनएसएस प्रणाली या वर्षी पूर्ण होत असून त्यासाठी १४२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
दक्षिण आशियात या प्रणालीचा मोठा उपयोग स्थाननिश्चितीसाठी होईल. १५०० कि.मी. टप्प्यातील कुठल्याही वस्तूचे अचूक स्थान सांगण्याची या प्रणालीची क्षमता राहील तसेच आपत्ती व्यवस्थापन, दिशादर्शन, वाहनांचे ठिकाण शोधणे, गिर्यारोहक व पर्यटकांना दिशा दाखवणे या सुविधा यात प्राप्त होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

*आयआरएनएसएस १ डी हा उपग्रह दिशादर्शन व नकाशा सेवेसाठी उपयुक्त
*कार्यकाल १० वर्षे
*अमेरिकेच्या जीपीएसशी बरोबरी
*वजन १४२५ किलो

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India launches fourth navigation satellite
Show comments