हवामानाचा अधिक अचूक अंदाज वर्तविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱया इन्सॅट ३डी या अत्याधुनिक उपग्रहाचे शुक्रवारी युरोपियन उपग्रह वाहकाच्या साह्याने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. फ्रेंच गयाना येथील उपग्रह प्रक्षेपक तळावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहामुळे हवामानाचा अधिक अचूकपणे अंदाज वर्तविणे शक्य होणार असून, त्याबरोबरच नैसर्गिक आपत्तींबद्दल सावध करण्याचे कामही शक्य होणार आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे १ वाजून २४ मिनिटांनी एरिएन-५ या उपग्रह वाहकामधून इन्सॅट ३डीचे प्रक्षेपण करण्यात आले. उपग्रहाला अवकाशातील त्याच्या नियोजित कक्षेमध्ये स्थिर करण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या हसन येथील कार्यालयातून शास्त्रज्ञ या उपग्रहाचे नियंत्रण करीत आहेत.