Visa Validity Of Pakistani Hindus: सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध भारतीय व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द मानले जातील. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकार कडक राजनैतिक आणि सुरक्षा उपाययोजना करत आहे. पण, व्हिसाबद्दल भारत सरकारचा हा नियम ज्या पाकिस्तानी हिंदूंना दीर्घकालीन भारतीय व्हिसा देण्यात आला आहे, त्यांना लागू होणार नाही. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद
गुरुवारी एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व वैध व्हिसा २७ एप्रिल २०२५ पासून रद्द केले ठरवले जातील.”
भारतीयांनी पाकिस्तान प्रवास टाळावा
सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, “पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध असतील. सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी सुधारित व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावा. भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनाही शक्य तितक्या लवकर भारतात परतण्याचा सल्ला देण्यात येत आहे.”
पाकिस्तानवर निर्बंध
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पाकिस्तानवर निर्बंध घालण्यासाठी पाच मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिका भारतात प्रवेश मिळणार नाही. तसेच केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी परवा पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.