चीनसोबत १९६२ साली झालेल्या युद्धात भारताला पराभवाचा कलंक केवळ तात्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यामुळे लागला.  त्यांनी युद्धामध्ये हवाईदल वापरण्यास परवानगी न दिल्यामुळे पराभव झाला, अशी टीका माजी हवाईदल प्रमुख ए.वाय. टिपणीस यांनी केली.  नेहरूंनी जागतिक राजकारणातील  उद्दिष्टय़े साधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांना बगल दिली होती, असा आरोपही त्यांनी केला.  ‘इंडिया अ‍ॅण्ड चायना : आफ्टर फाईव्ह डीकेड्स ऑफ १९६२ वॉर’ याविषयावर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या चर्चासत्रामध्ये टिपणीस यांनी नेहरुंवर टीकेच्या तोफा डागल्या.
चीनसोबतच्या युद्धात हवाईदलाचा वापर केला असता, तर निकाल वेगळा झाला असता, असे विद्यमान हवाईदल प्रमुख एन.ए.के. ब्राऊन यांनी सोमवारी स्पष्ट केले होते. त्याचाचा पुनरुच्चार तीव्रतेने करून टिपणीस यांनी मंगळवारी नेहरूंना लक्ष्य केले.  नेहरू हे आपले राजकीय हेतू साधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेला दावणीला लावत होते, याबाबतचे सत्य कमी अधिक प्रमाणात जगजाहीर आहे. त्यांची महत्त्वाकांक्षा ही जागतिक राजकारणामध्ये सक्रिय राहण्याची होती.  त्यामुळे चीनयुद्धाच्या पराभवाचे खरे शिल्पकार म्हणून त्यांचे नाव घेता येईल, असे टिपणीस यांनी नमूद केले. लष्करी भाष्यकारांमध्ये गेल्या पाच दशकांहून अधिक काळ  चीन युद्धात हवाईदल वापरले न गेल्याचा मुद्दा वादाचा ठरला आहे. टिपणीस यांच्या वक्तव्याने त्यात आणखी तेल ओतले गेले आहे.     

कोण आहेत टिपणीस?
टिपणीस १९६० सालापासून हवाईदलात ‘फायटर पायलट’ म्हणून सेवेत रुजू झाले. ३१ डिसेंबर १९९८ ते २००१ या कालावधीत ते हवाईदलप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

Story img Loader