द्विपक्षीय चर्चेत काश्मीर प्रश्नाचा समावेश करण्यास आडकाठी करून भारत प्रादेशिक शांतता व स्थिरतेच्या प्रयत्नात घातपात करीत आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.
अंतर्गत सुरक्षामंत्री निसार अली खान यांनी सांगितले, की या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्दय़ावर पाकिस्तानची स्पष्ट मते आहेत व आम्हाला शेजारी देशांशी मैत्रीचे संबंध हवे आहेत, पण दुर्दैवाने भारताकडूनही तसाच प्रतिसाद मिळायला पाहिजे तसा मिळत नाही. भारताने काश्मीरप्रश्नी सल्लामसलतीला जो आक्षेप घेतला तो असमर्थनीय आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरची चर्चा पाकिस्तानने रद्द केली होती, कारण भारताने चर्चेपूर्वी हुर्रियतच्या फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करण्यास पाकिस्तानला मनाई केली होती. भारत या ना त्या बहाण्याने शांतता व सुरक्षा प्रक्रियेत घातपात करीत आहे, असा आरोप करताना ते म्हणाले, की दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्यात काश्मीर प्रश्न हा मूळ अडथळा आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री फिलीप हॅमंड यांच्याशी बोलताना त्यांनी पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली.
काश्मीरशिवाय संवाद प्रक्रिया पुढे जाणार नाही हे लक्षात ठेवावे असे असले तरी पाकिस्तान शांतता प्रयत्न सुरू ठेवील, पण भारतासारख्या देशाचे वर्चस्व मान्य करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा