स्वित्र्झलडमधील बँकांमधील खातेधारकांच्या नावांची यादी मिळविण्यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असून याबाबत पुरावेही गोळा करीत असल्याची माहिती सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली.
भारताने याबाबत स्विस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून त्या देशातील कायद्याच्या अधीन राहून देशहिताचा करार केला जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
स्विस बँकेतील खातेधारकांच्या नावांची यादी मागितल्यानंतर तेथील सरकारने काही कायदेशीर बाबी उपस्थित केल्या आहेत. त्या देशातील कायद्याच्या अधीन राहून जे शक्य आहे तो करार केला जाईल. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, असेही जेटली म्हणाले.
बँकेतील खात्यांबाबतच्या माहितीची देवाणघेवण करण्यासाठी भारत आणि स्वित्र्झलड यांच्यात करार होणार आहे. त्यामुळे यापूर्वीच्या यादीबाबत त्या देशाकडून सहकार्य मिळालेले नाही. मात्र आम्ही त्याबाबत शर्थीचे प्रयत्न करीत आहोत. सदर यादीच्या पुष्टय़र्थ आम्ही पुरावे गोळा करीत आहोत, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.
सरकारला ७०० खातेदारांच्या नावांची यादी मिळालेली आहे, मात्र ती यादी जाहीर करावयाची नाही, अशी पूर्वअट घालण्यात आली आहे. त्यापूर्वीही भारताला अशी एक यादी मिळालेली आहे, असेही ते म्हणाले.
जेटलींनी‘गोवर्धन ’ पेलला – महाजन
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला ज्या तडफेने उत्तरे दिली, ते पाहून प्रभावित झालेल्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी जेटली यांची तुलना ‘गोवर्धन पर्वत’ पेलणाऱ्या भगवान श्रीकृष्णाशी केली. भगवान श्रीकृष्णाने जसा गोवर्धन पर्वत लीलया पेलला, त्याच पद्धतीने जेटली यांनी शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासाला एकतर्फी खिंड लढविली, असे महाजन म्हणाल्या. केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन या परदेशात असल्याने जेटली यांनी, सीताराम यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांनाही उत्तरे दिली.
भारतीय ‘इसिस’मध्ये ?
‘इस्लामिक स्टेट इन इराक अॅण्ड सिरिया’मध्ये (इसिस) सहभागी होण्यासाठी काही भारतीय युवक इराकला भेट देत असल्याचे वृत्त अस्वस्थ करणारे असल्याने याबाबत कठोर पावले उचलावी, अशी मागणी भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी लोकसभेत केली. मुंबईतील चार युवक इसिसमध्ये सहभागी झाल्याचे वृत्त असून, त्याबाबत कारवाईची गरज आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्याच्या हालचालींकडे लक्ष ठेवावे, असे आदित्यनाथ म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा