युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानसारख्या दहशतवादी गटांचा उपद्रव कमालीचा वाढला आहे. हा देश जर दहशतवाद्यांच्या हातात गेला तर आगामी काळात भारत हा तालिबान्यांचे लक्ष्य राहील, अशी भीती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी रविवारी व्यक्त केली.
राष्ट्रीय तपास संस्था दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पश्चिम बंगालचे राज्यपाल असणाऱ्या नारायणन यांनी सांगितले की, आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत कमालीची उदासीनता दाखवत आहे. त्याचा फटका आपल्या सुरक्षेला बसणार आहे. या पाश्र्वभूमीवर तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यास ते भारताला लक्ष्य करतील. त्यामुळे भारताने संभाव्य दहशतवादी धोक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ते धोरण अंगिकारणे गरजेचे असल्याचे नारायणन यांनी सांगितले.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये दहशतवादी संघटना कमालीच्या सक्रिय आहेत. त्याचा धोका आपल्या देशाला आहे. आतापर्यंत भारतात झालेल्या दहशतवादी कारवाया या पाकिस्तानस्थित दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आदींनी केल्या आहेत. सिमीसारख्या संघटनाही अशाचप्रकारे कारवाई करीत असल्याचे आढळून आल्याचे नारायणन यांनी सांगितले. याशिवाय कट्टरपंथी हिंदू संघटनाही  दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे दिसून आले असून मालेगाव बॉम्बस्फोट तसेच समझौता एक्स्प्रेससारख्या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता, असेही ते म्हणाले.   अल कायदा या दहशतवादी संघटनेचा घटक असलेल्या लष्कर-ए-तोयबाने गेली दोन दशके जगभरातील उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका तसेच भारतातही दहशतवादी कारवायांनी धुमाकूळ घातल्याचे नारायणन यांनी या वेळी सांगितले.