India on Syria War : सीरियामधील बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचे आणि अध्यक्ष बशर अल असाद यांची राजवट उलथवून टाकल्याचे रविवारी (८ डिसेंबर) सरकारी वाहिनीवरून जाहीर करण्यात आले. तसेच, तुरुंगातील सर्व कैद्यांची मुक्तता करत असल्याचेही बंडखोरांनी घोषित केले. बंडखोर दमास्कसमध्ये शिरत असताना लष्कराने आधीच माघार घेतली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असाद यांनी दमास्कस सोडले असून त्यांनी रशियात शरण घेतली आहे. बंडखोरांनी २७ नोव्हेंबर रोजी सीरियाच्या वायव्येस मोर्चेबांधणी केली. त्यानंतर बंडखोरांनी दक्षिणेकडे सरकण्यास सुरुवात केली. या बंडखोरांच्या अनेक तळांवर गेल्या काही दिवसांमध्ये बशर यांच्या फौजांनी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या इराण, रशियासारख्या देशांनी हवाई हल्ले केले होते. परंतु, सीरियाच्या लष्कराकडे बंडखोरांचा रेटा थोपवण्याची क्षमता नव्हती. प्रत्येक ठिकाणी त्यांचा पराभव होऊ लागला. २९ नोव्हेंबर रोजी बंडखोरांनी अलेप्पो या सीरियाच्या दुसऱ्या मोठ्या शहरावर ताबा मिळवला.
बंडखोरांनी ५ डिसेंबर रोजी हमा आणि ७ डिसेंबर रोजी हॉम्स हे सीरियाचे तिसरे मोठे शहर बंडखोरांनी जिंकून घेतले. इराण सध्या इस्रायलबरोबरच्या संघर्षात व्यस्त आहे. लेबनॉनमधील हेझबोला ही संघटना मरनासन्न अवस्थेत आहे. इस्रायलने लेबनॉनचं कंबरडं मोडलंय. रशियाचं बळ युक्रेनबरोबरच्या युद्धात खर्च होत आहे. त्यामुळे सीरियाला त्यांच्या मित्रराष्ट्रांकडून पुरेशी मदत मिळाली नाही. अखेर दमास्कस हे राजधानीचे शहर तुलनेने फारच कमी प्रतिकारासह बंडखोरांच्या ताब्यात आले.
हे ही वाचा >> VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
भारताचे नागरिकांना परत आणण्याचे प्रयत्न
दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर बंडखोर इराणच्या दूतावासामध्ये घुसले आणि तिथे मोडतोड केली. परिस्थिती लक्षात घेऊन इराकने आपले दूतावास रिकामे केले असून तेथील कर्मचाऱ्यांना लेबनॉनमध्ये हलवले. दरम्यान, लेबनॉनने बैरुतला दमास्कसशी जोडणारा मार्ग वगळता सीरियाबरोबरची भूसीमा बंद करत असल्याचे सांगितले आहे. आमच्या नागरिकांना देशाबाहेर जाऊ दिले जावे असे आवाहन चीनने तेथील संबंधित पक्षांना केले आहे. भारतानेही शनिवारीच आपल्या नागरिकांसाठी धोक्याची सूचना जारी केली आहे. त्याशिवाय अन्य देशही आपापल्या नागरिकांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत.
हे ही वाचा >> Humayun Kabir : “पश्चिम बंगालमध्ये नवी बाबरी मशीद बांधणार आणि…”; तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची घोषणा
भारताची पहिली प्रतिक्रिया
या सर्व घडमामोडींनंतर भारत सरकारने पहिल्यांदाच तिथल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की “सीरियामध्ये चालू असलेल्या घडामोडींवर, तिथल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तिथे घडणाऱ्या घडामोडी पाहता सीरियाची एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता जपण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आम्ही सीरियन नागरिकांच्या, तिथल्या सर्व वर्गांच्या, सर्व प्रकारच्या हितसंबंधांचं रक्षण करणाऱ्या शांततापूर्ण व सर्वसमावेशक राजकीय प्रक्रियेचं समर्थन करतो. दमास्कसमधील आमचा दूतावास सीरियामधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या संपर्कात आहे”.