पीटीआय, नवी दिल्ली : United Nations Population Report संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार आता भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकले आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली असून चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. विशेष म्हणजे भारताच्या लोकसंख्येत पुढली तीन दशके वाढ कायम राहणार असून त्यानंतर घट सुरू होईल, असे अनुमान संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने काढले आहे.
‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (यूएनएफपीए) या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२३’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षाही अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार भारतामध्ये १५ ते ६४ या कमावित्या वर्षांमधील नागरिकांचे प्रमाण लोकसंख्येच्या ६८ टक्के आहे. शून्य ते १४ या वयोगटात २५ टक्के, १० ते १९ वयोगटात १८ टक्के, १० ते २४ वयोगटात २६ टक्के नागरिक आहेत. ६५ वर्षांवरील निवृत्तीच्या वयातील नागरिकांचे प्रमाण अवघे सात टक्के आहे. देशात केरळ आणि पंजाब या राज्यांमध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक असून बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्ये तुलनेने ‘तरुण’ असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. १९५० पासून जागतिक लोकसंख्येची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांमार्फत जाहीर होऊ लागली. त्यानंतर प्रथमच या यादीत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
‘यूएनएफपीए’च्या अंदाजानुसार २०५० सालापर्यंत भारताची लोकसंख्या १६६.८ कोटींपर्यंत गेली असेल तर त्यावेळी चीनची लोकसंख्या १३१.७ कोटींपर्यंत आक्रसण्याची शक्यता आहे. २०३० सालापर्यंत भारतातील वृद्धांची लोकसंख्या आताच्या बरोबर दुप्पट, १९.२ कोटी होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. २०५० सालापर्यंत दर पाच व्यक्तींपैकी एक भारतीय वृद्ध असेल. हे लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा आणि आरोग्य यासाठी आगामी काळात नियोजन करावे लागेल, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.
तरुण, महिलांचे महत्त्व अधिक
‘यूएनएफपीए’च्या भारतातील प्रतिनिधी अँड्री वोजनर यांनी भारताच्या लोकसंख्येत असलेले तरुणांचे प्रमाण महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. १५ ते २४ वयोगटात २५.४ कोटी भारतीय असून ते सर्जनशीलता, नवे विचार आणि स्थिर परिणामांचे उगमस्थान आहेत. देशातील महिला आणि मुलींना समान शिक्षण आणि संधी मिळणे आणि प्रजननाच्या निर्णयाचे स्वातंत्र्यही महिलांना असणे हे भारताच्या आगामी वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचेही वोजनर यांनी स्पष्ट केले.
चीनकडून महत्त्व नाही
लोकसंख्येमध्ये भारताच्या मागे पडल्याच्या घटनेला चीनने फारसे महत्त्व दिलेले नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता वांग वेनबिन म्हणाले, की लोकसंख्येपेक्षा तिचा दर्जा अधिक महत्त्वाचा आहे. चीनमध्ये आजही ९० कोटी कमावते हात आहेत आणि देशाच्या विकासाला त्यांचा मोठा हातभार लागत असल्याचेही वेनबिन यांनी म्हटले आहे.