विकासाच्या मार्गावर जाताना भारताकडे भक्कम संरक्षण व्यवस्था आणि वचक असणे गरजेचे आहे. त्यामुळे गरज भासलीच, तर ताकदीचा वापर करण्यास तयार असले पाहिजे असे विधान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी केले. भारतीय उपखंडापुढे सध्या अनेक आव्हानं आणि धोके आहेत. या परिस्थितीत शांततेचे वातावरण राखणे ही प्राथमिकता असली तरी देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम असणे गरजेचे आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले. वेळ पडल्यास ताकदीचाही वापर करण्यास आपण सज्ज असले पाहिजे असेही ते म्हणाले.
तेजपूर हवाई तळावर झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हवाई दलातील ‘हेलिकॉप्टर युनिट ११५’ आणि ‘२६ स्क्वॉड्रन’ला प्रेसिडेन्शिल स्टँडर्डने गौरविण्यात आले. त्यावेळी मुखर्जी बोलत होते. ‘सध्या आपला देश अनेक क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. देश म्हणून भारत शांततेशी कटिबद्ध आहे. मात्र, एखादा देश प्रगतीच्या वाटेवर चालत असताना अनेकदा बाह्य शक्ती सक्रीय होतात. त्यांना थोपवून शांतता, सौहार्द टिकविण्यासाठी देशाचे संरक्षणकवच मजबूत करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर, देशाचे सार्वभौमत्व अखंड राखण्यासाठी ताकद दाखवण्याचीही धमक आणि तयारी ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.
समानतेच्या मूल्यावर विश्वास ठेवणारे राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे आणि ही ओळख निर्माण करण्यामागे देशातील प्रत्येक महिला आणि पुरूषाचे समान श्रेय आहे. तसेच भक्कम संरक्षणाची हमी देणाऱया देशाच्या सैन्याचा मला सार्थ अभिमान असल्याचेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.

Story img Loader