भारतासमोर सध्या उद्भवलेल्या आर्थिक संकटातून देशाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांची नव्हे तर वास्तववादी नेतृत्वाची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केले. पंतप्रधानांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील दिरंगाईचा राजनाथ यांनी यथेच्छ समाचार घेतला. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या आर्थिक धोरणांची तुलनाही केली.
रालोआच्या काळात चालू खात्यावर कधीही तूट नव्हती, पण अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारच्या काळात मात्र चालू खात्यावरही तूट निर्माण झाली. या सरकारच्या काळात रुपया प्रचंड घसरला, तर डॉलरला मात्र झळाळी येत गेली. गुंतवणूकदारांनीही एतद्देशीय गुंतवणुकीपेक्षा बाहेर गुंतवणूक करण्याचा पर्याय स्वीकारला, असे अर्थतज्ज्ञ पंतप्रधान असण्यापेक्षा वाजपेयींसारखे ‘वास्तववादी’ पंतप्रधान देशासाठी अधिक गरजेचे आहेत, असे वाग्बाण राजनाथ यांनी सोडले.
अत्यंत चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे भारतावर ही दुरवस्था ओढवली आहे. सरकार भ्रष्टाचाराने पोखरले गेले असून, भाजपच्या- रालोआच्या हाती पुन्हा सत्ता आल्यास देशाची विकासाकडे दमदार वाटचाल पुन्हा सुरू होऊ शकेल, असे राजनाथ यांनी सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यावसायिकांच्या आणि उद्योजकांच्या कार्यक्रमात राजनाथ सिंग बोलत होते.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून राजनाथ सिंग यांची रविवारी औपचारिक घोषणा झाली.

Story img Loader