Donald Trump Tariff Cut Claim: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अतिशयोक्तीपूर्ण दावे करण्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच, व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान, त्यांनी युरोपकडून युक्रेनला मिळणाऱ्या निधीबाबत एक दावा केला, जो त्याच वेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी, “भारताने अमेरिकन उत्पादनांच्या आयातीवरील कर कमी केले जातील असे आश्वासन दिले आहे”, असा दावा केला होता. आता त्यांचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी संसदीय समितीला सांगितले आहे की, अमेरिकेला असे कोणतीही आश्वासन देण्यात आलेले नाही.

कोणतेही आश्वासन दिले नाही

वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणाले की, भारताने अमेरिकेला शुल्क कमी करण्याबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. वाणिज्य सचिवांनी परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय समितीला सांगितले की, “भारत आणि अमेरिकेत अजूनही चर्चा सुरू आहे. सध्या कोणताही व्यापार करार अंतिम झालेला नाही.”

संसदीय समितीच्या अनेक सदस्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दाव्यावर चिंता व्यक्त केली होती. यावर उत्तर देताना बर्थवाल म्हणाले, “अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दाव्यांवर आणि मीडिया रिपोर्ट्सवर आधारित काहीही सांगता येत नाही. सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. भारताने अमेरिकेला आयात शुल्क कमी करण्याचे कोणतेही आश्वासन दिले नाही.”

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, “भारत आमच्याकडून खूप जास्त आयातशुल्क वसूल करतो. इतके की तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाहीत. आता भारताचा कुणीतरी भांडाफोड केल्यामुळे त्यांनी आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.”

आमच्या देशाला प्रत्येकाने लुटले

व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी म्हटेल होते की, “आमच्या देशाला प्रत्येकाने लुटले आहे. आम्ही ही लूट थांबवली आहे. माझ्या पहिल्या टर्ममध्ये मी यावर काही प्रमाणात निर्बंध आणले होते. अमेरिकेला आर्थिक, वित्तीय आणि व्यापारी दृष्टीकोनातून जगातील अनेक देशांनी लुटले आहे. माझ्या दुसऱ्या कार्यकाळात ही लूट थांबविण्याचा मी प्रयत्न करत आहे.”

जशास तसे उत्तर देण्याची भूमिका

तत्पूर्वी ५ मार्च रोजी अमेरिकेच्या संयुक्त अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातशुल्क वाढीला जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, “भारत आमच्याकडून अधिक आयातशुल्क वसूल करत आहे, त्यामुळे आम्हीही आयातशुल्क वाढवू.”

Story img Loader