इराक व सिरियामध्ये उभ्या राहिलेल्या ‘इस्लामिक स्टेट’विरुद्धच्या कोणत्याही आघाडीत भारत सहभागी होणार नाही, मात्र अशा दहशतवादी गटांमध्ये सामील होण्यासाठी जगभरातून पश्चिम आशियात जाणाऱ्यांना रोखण्यासाठी अमेरिकेशी सहकार्य करण्याची तयारी भारताने दाखवली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात मंगळवारी अनेक विषयांवर शिखर चर्चा झाली. त्या चर्चेचा गोषवारा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील अमेरिका विभागाचे संयुक्त सचिव विक्रम दोरायस्वामी यांनी पत्रकारांना सांगितला. पश्चिम आशियातील ‘इस्लामिक स्टेट’च्या विरोधातील कोणत्याही आघाडीत भारत सहभागी होणार नाही, असे भारताने नि:संदिग्धपणे स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. इराक आणि सिरियामध्ये ज्या प्रदेशावर इस्लामिक स्टेटने कब्जा केला आहे त्या प्रदेशावर अमेरिकेच्या पुढाकाराने हवाई हल्ले सुरू आहेत, मात्र या अथवा अन्य कोणत्याही आघाडीत भारत सहभागी होणार नाही, असे दोरायस्वामी म्हणाले.
मात्र, इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी धर्मवेडाने प्रेरित झालेले तरुण जगभरातून जात आहे. हा ओघ रोखण्यासाठी भारत अमेरिकेशी सहकार्य करील, असेही दोरायस्वामी यांनी स्पष्ट केले. हा अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा असून भारतातूनही अनेक तरुण इस्लामिक स्टेटकडे जात आहेत. त्यांना या अत्यंत घातक मार्गावरून माघारी आणणे आवश्यक आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे,  असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा