खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंतसिंग पन्नूची हत्या करण्याचा भारताचा कट अमेरिकेने हाणून पाडला असून अमेरिकेने या कटातल्या सहभागाबद्दल भारताला इशारा दिला होता, असं वृत्त ‘फायनान्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केलं आहे. हरदीपसिंग निज्जर हत्याप्रकरण अद्याप थंड झालेलं नाही, तोच आता गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमेरिकेने भारताकडे बोट दाखवलं आहे. कॅनडामध्ये खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय हस्तकांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच आपल्याकडे यासंबंधी पुरावे आहेत, असा दावाही ट्रुडो सातत्याने करत आहेत. हे प्रकरण अद्याप तापलेलं आहे. अशातच पन्नू प्रकरणामुळे नवा वादंग निर्माण होण्याचे संकेत आहेत.

दरम्यान, भारतावरील अमेरिकेच्या आरोपांना मोदी सरकारने उत्तर दिलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बागची म्हणाले, अमेरिकेत एका व्यक्तीच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकाचा सहभाग असल्याचा आरोप चिंताजनक आणि आपल्या सरकारी धोरणांविरोधात आहे.

गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येच्या कटाप्ररकरणी अमेरिकेच्या न्यायखात्याने मॅनहॅटन न्यायालयात एक आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्राबाबत केंद्रीय सरकारी वकील डॅमियन विल्यम्स यांनी बुधवारी माहिती दिली. विल्यम्स यांनी दिलेल्या महितीनुसार निखिल गुप्ता याने भारत सरकारचा कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने न्यूयॉर्कचा रहिवासी असलेल्या शीख फुटिरतावादी नेत्याच्या हत्येचा कट आखला होता. विल्यम्स यांनी खलिस्तानी फुटिरतावादी आणि कथित भारतीय अधिकाऱ्याचं नाव जाहीर केलेलं नाही. तर निखिल गुप्ताविरोधात दोन आरोप ठेवण्यात आले असून तो सध्या झेक प्रजासत्ताक येथे अटकेत आहे. झेक प्रजासत्ताककडून अमेरिकेत हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> हेन्री किसिंजर.. अमेरिकी शीतयुद्ध परराष्ट्र नीती सूत्रधार.. पाकिस्तानमित्र नि भारतद्वेषी.. वादग्रस्त नोबेलविजते…!

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रायलाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, भारताने अमेरिकेशी द्विपक्षीय सुरक्षा सहकार्यावर बातचीत केली. त्यानंतर अमेरिकेने संबंधित प्रकरणाची काही माहिती शेअर केली आहे. आम्ही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहोत. तसेच या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी एक उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी समितीच्या निष्कर्षाच्या आधारावर पुढची कार्यवाही केली जाईल. अमेरिकन न्यायालयाने हत्येच्या कटाशी भारतीय अधिकाऱ्याचा संबंध जोडला आहे, ही चिंतेची बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित गुन्हेकारी, तस्करी या गंभीर समस्या आहेत. चौकशी समितीने याप्रकरणी आपला अहवाल दिल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.