गेल्या आठवड्याभरापासून म्हणजेच २१ जूनपासून देशात १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात लसीकरणाचा वेग वाढला असून आजच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आज २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं वर्णन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलं आहे.

 

काय सांगते आकडेवारी?

आरोग्य मंत्रालयाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातली जगातील ६ देशांमधली आकडेवारी दिली आहे. यामध्ये भारतात सर्वाधिक (३२,३६,६३,२९७) लसीचे डोस देण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत आजपर्यंत सर्व प्रकारच्या लसींचे मिळून ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन (७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९०), जर्मनी (७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४), फ्रान्स (५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८) आणि इटली (४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१) या देशांचा क्रमांक लागतो.

 

२१ जून रोजी पहिल्याच दिवशी विक्रमी ८३ लाख लोकांना लस देण्यात आली. मात्र, दुसऱ्याच दिवशी हे प्रमाण घटल्यामुळे काँग्रेसकडून यावर टीका करण्यात आली आहे. “डेल्टा प्लस व्हेरिएंट देशात दाखल झाला आहे. आत्तापर्यंत फक्त ३.६ टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. पण पंतप्रधान मात्र इव्हेंट मॅनेजरच्या भूमिकेत दिसत आहेत. स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी लसीकरणामध्ये ४० टक्क्यांची घट आली आहे”, असं ट्वीट करत प्रियांका गांधींनी निशाणा साधला आहे.

 

“पंतप्रधान स्वत:ची पाठ थोपटून घेत होते आणि दुसऱ्याच दिवशी…!” – वाचा सविस्तर

दरम्यान, एकीकडे केंद्र सरकारकडून जगात सर्वाधिक लसी दिल्याचा दावा केला जात असताना तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी यावरूनच केंद्रावर निशाणा साधला आहे. दोन दिवसांपूर्वी डेरेक ओब्रायन यांनी केलेल्या ट्वीटमध्ये केंद्रानं ठरवलेलं लसीकरणाचं लक्ष्य आणि वास्तवाक झालेलं लसीकरण अशी आकडेवारी देऊन त्यांनी निशाणा साधला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी २२ जूनपर्यंत आपण किती लसीकरण केलं याची आकडेवारी दिली आहे.

 

आपण ९० कोटी लोकसंख्येला लस देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, तर फक्त ५ कोटी लोकांना लस देऊ शकलो आहोत. तर १८० लसीचे डोस देण्याचं लक्ष्य आपण ठरवलेलं असताना फक्त २९ कोटी डोस (२२ जूनपर्यंत) आपण देऊ शकलो आहोत, असा दावा या ट्वीटमध्ये ओब्रायन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये करण्यात आला आहे.

Story img Loader