स्वातंत्र्य दिन जवळ येत असतानाच भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमालीचा वाढत आहे. पाकिस्तानने सोमवारी तीन वेळा भारतीय हद्दीत जोरदार गोळीबार केला असून उभय देशांतील शस्त्रसंधीचा भंग करण्याचा हा गेल्या तीन दिवसांतला सातवा प्रकार आहे. त्याचवेळी भारताकडूनच शस्त्रसंधीचा वारंवार भंग होत असल्याचा कांगावा करीत पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत सैन्याची मोठय़ा प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारताच्या राजदूतांना बोलावून घेऊन या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबद्दल पाकिस्तानने निषेध नोंदविला आहे.
सीमेवर तणाव वाढत असतानाच दोन्ही देशांतील राजकीय आसमंतही तापत चालला आहे. पाकिस्तानच्या बाजूने होणाऱ्या गोळीबारास तेवढेच ठोस प्रत्युत्तर द्या, असे लष्करप्रमुखांनीही बजावले असतानाच सीमेवर परिस्थितीनुरूप कारवाई करण्याची सैन्यास पूर्ण मोकळीक आहे, असे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनीही जाहीर केले आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान सीमेवरील आपले सर्व सैन्य हलवून ते भारतालगतच्या सीमेवर आणावे, अशी मागणी पाकिस्तानच्या लष्कराने केली आहे. या आठवडय़ातच पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानच्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक होत असून त्यात लष्कराच्या मागणीबाबत निर्णय केला जाणार आहे. भारतातील आपल्या दूतावासातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना माघारी बोलाविण्याचा विचार पाकिस्तान करीत असल्याचे वृत्त ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिले आहे. पाकिस्तानने सोमवारी भारताच्या उप उच्चायुक्तांना पाचारण केले आणि २००३ मध्ये झालेल्या शस्त्रसंधी कराराचा भारताकडून भंग सुरू असल्याबद्दल खडसावले, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे नमूद केले आहे. भारताच्या गोळीबारात रावळकोटमधील निरपराध नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. प्रत्यक्षात पाकिस्ताननेच सोमवारी पहाटे एक वाजून पन्नास मिनिटांपासून रात्री साडेनऊपर्यंत तीन वेळा भारतीय सरहद्दीतील लष्करी ठाण्यांच्या दिशेने गोळीबार केला, असे परराष्ट्र प्रवक्त्याने सोमवारी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा