वाघा सीमारेषेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानमधील आयात-निर्यात लवकरच वाढणार आहे. या सीमारेषेवरून उभय देशांना लवकरच १०० टक्केआयात करता येईल, असा विश्वास भारताचे उच्चायुक्त शरत सभरवाल यांनी व्यक्त केला. लाहोर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे ते बोलत होते.
वाघा सीमारेषेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आयात-निर्यात व्हावी, यासाठी पाकिस्तान सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. सध्या या सीमारेषेवरून केवळ १३८ प्रकारच्या वस्तूंचा व्यापार होतो, मात्र पाकिस्तानने आपले धोरण अधिक उदार केल्यानंतर भारत सरकार निर्यातीच्या प्रमाणात ३० टक्क्य़ांनी वाढ करेल, कालांतराने उभय देशांकडून हे प्रमाण वाढत जाईल आणि येत्या काही वर्षांत वाघा सीमारेषेवरून प्रत्येक वस्तूची आयात-निर्यात सुरू होईल, सार्क परिषदेत झालेल्या ‘साऊथ एशियन ट्रेड एरिया’ या करारानुसार हा व्यापार होणार आहे, असे ते म्हणाले.
भारत-पाकिस्तानमधील व्यापाराचे प्रमाण सध्या अत्यल्प आहे, युरोपीय महासंघाच्या सदस्य राष्ट्रांत परस्पर व्यापाराचे प्रमाण ६५ टक्के,तर आग्नेय आशियाई देशांमध्ये हे प्रमाण २५ टक्केआहे, असेही त्यांनी सांगितले.
 या माध्यमातून ७० किलोमीटरच्या एका लहान वाहिनीद्वारे पाकिस्तानला भारताकडून पेट्रोलजन्य पदार्थ व द्रवरूप नैसर्गिक वायू मिळू शकेल. – भारताचे उच्चायुक्त शरत सभरवाल

मोबाइल सेवा सुरू होणार?
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये मोबाइल सेवा सुरू करण्यास मान्यता दिल्याचे पाकिस्तानच्या संसदीय मंडळास अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, अद्याप या संदर्भात काही बाबींची पूर्तता करावी लागणार आहे, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
नॅशनल असेंब्लीच्या वाणिज्यविषयक स्थायी समितीमधील सदस्यांना माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांनी, दोन्ही देशांमध्ये मोबाइल सेवा सुरू करण्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र दोन्ही देशांमध्ये आधुनिक दळणवळण सुविधांचा अभाव असल्याबद्दल संसदीय मंडळाने खंत व्यक्त केली.भारत आणि पाकिस्तानमधील दूरदळणवळण कंपन्यांमधील तांत्रिक अडचणी ही यामधील मुख्य समस्या आहे. कारण दोन्ही देशांना आपापल्या संलग्न कंपन्यांकडून अथवा त्यांच्या मंडळांकडून यासाठी मान्यता घ्यावी लागणार आहे, असे वाणिज्य सचिव मुनीर कुरेशी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे, असे मत संसदीय मंडळातील काही सदस्यांनी व्यक्त केले.    

Story img Loader