SP Leader Swami Prasad Maurya: समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीसाठी हिंदू महासभा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांची जी फाळणी झाली त्यासाठी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना नाही तर हिंदू महासभा जबाबदार होती असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसंच हिंदू राष्ट्राची मागणी करणारे लोक हे देशाचे शत्रू आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या बांदा या ठिकाणी प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे.
काय म्हणाले स्वामी प्रसाद मौर्य?
“भारताची घटना हे सांगते की धर्म, जात, लिंग, जन्मस्थळ यांच्या आधारे कुठलाही भेदभाव करता येत नाही. जर कुणीही हिंदू राष्ट्र हवं अशी मागणी करत असेल तर दुसरे लोकही तशी मागणी करणार नाहीत का? जे हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत ते देशाचे शत्रू आहेत. याआधी हिंदू महासभेने हिंदू राष्ट्राची मागणी केली होती. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यातली फाळणी ही बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्यामुळे नाही तर हिंदू महासभेमुळे झाली. याआधीही मौर्य यांनी अशाच प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं. हिंदू हा कुठलाही धर्म नाही तर तो फक्त एक धोका आहे. ब्राह्मणवादाची मुळं खूप खोलवर रुजली आहेत समाजातल्या असमानतेचं कारण ब्राह्मणवाद आहे या आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. ज्यावरुन बराच वाद झाला होता. आथा पुन्हा एकदा त्यांनी फाळणीसाठी हिंदू महासभा जबाबदार होती असं म्हटलं आहे.
प्रमोद कृष्णम यांची मौर्य यांच्यावर टीका
यानंतर आता काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी मौर्य यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. हिंदूंना शिव्या देणं ही हल्लीची फॅशन होत चालली आहे. सपा नेते मौर्य यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. ते रोज जिथे जातात त्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्माचा अपमान करतात. अखिलेश यादव यावर त्यांना काहीही समज देत नाहीत याचं आश्चर्य वाटतं असं आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे. तसंच ते म्हणाले मला वाटतं आता समाजवादी पार्टीला हिंदू मतांची आवश्यकता राहिलेली नाही.