प्रयागराज : भारत व पाकिस्तानमध्ये सौहार्द नांदावे अशी अपेक्षा येथील कुंभमेळ्यात आलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळातील साई साधराम यांनी व्यक्त केली. पाकिस्तानमधील काही हिंदू कुंभमेळ्यासाठी आले आहेत. सिंधमधील खासदार डॉक्टर दर्शनलाल हे देखील यानिमित्त प्रयागराज येथे त्यांच्यासमवेत आले आहेत. दर्शनलाल हे पाकिस्तान मुस्लीम लीग एन गटाचे आहेत. वादापेक्षा समन्वयातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे संघर्ष करून फायदा नाही, असे साई साधराम यांनी नमूद केले. पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत त्यांनी फारसे भाष्य केले नाही. मात्र आम्हाला त्याचे चटके बसले असे सांगत अप्रत्यक्षपणे तेथील स्थितीची कल्पना दिली. कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या कलाग्रामला पाकिस्तानी प्रतिनिधींनी भेट दिली. हा सोहळा म्हणजे सांस्कृतिक विविधतेचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानमधील सात जणांचे हे प्रतिनिधी मंडळ आहे. लखनऊ तसेच अयोध्येतही ते भेट देणार आहे. येथे येऊन भारावून गेल्याचे त्यांनी स्पष्ट करत, कुंभनिमित्त कलाग्राममध्ये उभारलेल्या विविध दालनांना त्यांनी भेट दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलाग्रामची उभारणी

दहा एकरात या कलाग्रामची उभारणी करण्यात आली. १२ ज्योतिर्लिंगाप्रमाणे याची रचना करण्यात आली. यात विविध राज्यांची कला, संस्कृती तसेच खाद्यापदार्थांची विविध दालने आहेत. महाकुंभ सुरू झाल्यापासून रोज पन्नास हजार नागरिक याला भेट देत होते. मात्र चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर यात घट झाल्याचे हरियाणातील विक्रेते अशोककुमार यांनी नमूद केले. यानिमित्ताने कलाग्राममध्ये देशभरातील १५ हजार कलाकार सादरीकरण करणार आहेत. दीड महिना याच्या नियोजनात गेल्याचे सांस्कृतिक खात्याच्या सहसचिव अमृता प्रसाद सारभाई यांनी नमूद केले.

२६ फेब्रुवारीपर्यंत हे कलाग्राम खुले राहील.

राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव

विविध राज्यांतील कलागुणांचे यानिमित्ताने प्रदर्शन असा एक राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव महाकुंभच्या निमित्ताने येथे भरला आहे. अनुभूत मंडपम येथे गंगावर्तन हा कार्यक्रम याचे आकर्षक ठरलाय. आधुनिक तंत्र, उत्तम संगीत व स्लाइडचा वापर त्याला त्रिमितीय तंत्राची जोड देण्यात आली. नाशिकमध्ये २०२७मध्ये होणाऱ्या कुंभमध्येही अशाच स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन शक्य असल्याचे सारभाई यांनी नमूद केले.

दुर्गा तसेच गणेशाचे चित्र आकर्षक

कलाग्रामच्या प्रवेशद्वारावर माँ दुर्गा आणि गणरायाची कथा सांगणारी भव्य पट्टचित्र आहेत. याखेरीज विठ्ठल आणि पाठीमागे भगवान जगन्नाथ यांचे आकर्षक चित्र साकारण्यात आले. एका मुस्लीम कुटुंबाने ही रेखाटली आहेत. याखेरीज ललित कला अकदामीतर्फे देशभरातील सर्वात मोठी छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

महाकुंभसाठी आलेल्या नागरिकांना देशाच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन कलाग्राम पाहिल्यानंतर घडते. कलावंतांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. – अमृता प्रसाद सारभाई, सहसचिव, सांस्कृतिक विभाग