प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या ज्या काही घटना घडल्या त्या अत्यंत निराशाजनक आहेत आणि म्हणूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा चर्चा सुरू होण्यासारखी सध्या परिस्थिती नाही, असे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी शनिवारी नमूद केले. नियंत्रण रेषेवरील घटनांमुळे उभय देशांमधील संबंध पूर्ववत होण्यासारखे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अलीकडच्या घटनांमुळे चर्चेच्या प्रक्रियेवर काही परिणाम झाला आहे काय, या प्रश्नावर खुर्शिद यांनी आपले मत मांडले. ‘तथाकथित चर्चा’ करण्याच्या परिस्थितीत सध्या आपण नाही, हे सांगितलेच पाहिजे. नियंत्रण रेषेवरील घटनांच्या संदर्भात, तेथील परिस्थिती हाताळण्यास लष्कर सक्षम असून संरक्षणमंत्रीही योग्य पद्धतीने काम करीत आहेत; परंतु वातावरण पूर्ववत होण्यास हे पुरेसे नाही, असे खुर्शिद म्हणाले. आम्ही सर्वसमावेशक चर्चेची तयारी दर्शविली; परंतु तो सध्या स्थगित झाला आहे. दोन्ही देशांचे पंतप्रधान गेल्या महिन्यात न्यूयॉर्क येथे भेटल्यानंतर चर्चा सुरू करण्यासंबंधी कोणत्याही तारखा निश्चित झालेल्या नाहीत. केव्हा आणि कोणत्या टप्प्यावर राजकीय स्तरावरील चर्चा सुरू करावयाची, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही खुर्शिद यांनी सांगितले. नियंत्रण रेषेवरील घटना निश्चितच अप्रिय आहेत. मात्र, चर्चेद्वारे वातावरण पूर्ववत व्हावे म्हणून दोन्ही बाजूंनी पुढे येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
अरुणाचल प्रदेशातील दोघा तिरंदाजांना चीनकडून ‘स्टॅपल’ केलेला व्हिसा दिल्याच्या घटनेप्रकरणी अशा अप्रिय घटनांमुळे सीमावादासारख्या मुद्दय़ांवरून काही तणाव वाढतात, परंतु त्यामुळे अन्य क्षेत्रांतील सहकार्यावर त्याचा परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा खुर्शिद यांनी व्यक्त केली. चीनशी मतभेदाचे काही मुद्दे निश्चित आहेत. त्यामध्ये सीमावादाचा अनिर्णीत मुद्दा महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा