देशभरात सोमवारी भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याच्या एक दिवसआधी भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधत भारत-पाकिस्तान फाळणीसंदर्भातला एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. “फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. अखंड भारताच्या फाळणीला जबाबदार घटनांचा आढावा या व्हिडीओतून घेण्यात आला आहे. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मोहम्मद अली जिनांच्या मुस्लीम लीग पुढे झुकून भारताची फाळणी केली, असा आरोप या व्हिडीओमधून करण्यात आला आहे.
या व्हिडीओवर आक्षेप घेत काँग्रेसकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. क्लेशदायक ऐतिहासिक घटनांच्या स्मृतींचा दिवस पाळून याद्वारे सध्या सुरू असलेल्या राजकीय लढायांना खतपाणी घालण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा हेतू असल्याचा पलटवार काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी केला आहे. आधुनिक काळातील सावरकर आणि जिन्ना देशाची फाळणी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीकाही रमेश यांनी केली आहे.
भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान भारतीयांनी भोगलेल्या दु:खाची आणि बलिदानाची आठवण करून देण्यासाठी दरवर्षी १४ ऑगस्टला “फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस” पाळण्याचे आवाहन गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीट देखील केलं आहे.
दरम्यान, भाजपानं प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओमध्ये फाळणीचा नकाशा तयार करणाऱ्या साईरील जॉन रॅडक्लिफ यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीला भारताच्या सांस्कृतिक वारशाचं ज्ञान नाही, त्या व्यक्तीला केवळ तीन आठवड्यांमध्ये भारताची फाळणी कशी काय करू देण्यात आली? असा सवाल या व्हिडीओमधून करण्यात आला आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा, सभ्यता, मूल्यं, तीर्थक्षेत्रं यांची माहिती नसलेल्या व्यक्तीने शतकानुशतके एकत्र राहणाऱ्या लोकांमध्ये सीमारेषा आखली, अशी टीका या व्हिडीओमधून करण्यात आली आहे. या फुटीरतावादी वृत्तीविरोधात लढण्याची जबाबदारी असलेले लोक तेव्हा कुठे होते, असा सवाल ट्वीट करत भाजपानं विचारला आहे.
या प्रश्नाला जयराम रमेश यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “दोन राष्ट्रांची निर्मिती करण्याची खरी संकल्पना सावरकरांची होती हे सत्य आहे. हीच संकल्पना पुढे जिन्नांनी सत्यात उतरवली”, अशी आठवण रमेश यांनी भाजपाला करुन दिली. “जर आपण फाळणीचा स्वीकार केला नाही तर भारताचे अनेक तुकडे होऊन हा देश पूर्णपणे उद्ध्वस्त होईल”, असे दिवंगत तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी म्हटल्याचा पलटवारही रमेश यांनी केला.
“काँग्रेस महात्मा गांधी, नेहरू, पटेल आणि भारताच्या एकात्मतेसाठी झटणाऱ्या प्रत्येकाचा वारसा यापुढेही जपणार आहे. द्वेषाच्या राजकारणाचा लवकरच पराभव होईल”, असे म्हणत रमेश यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
भाजपाने प्रसिद्ध केलेल्या या व्हीडिओमध्ये भारतातील कम्युनिस्ट पक्षांवर देखील निशाणा साधण्यात आला आहे. कम्युनिस्ट नेत्यांनी मुस्लीम लीगला पाठिंबा देत भारत-पाकिस्तान फाळणीला समर्थन दिले, असा आरोप यात करण्यात आला आहे.