पाकिस्तानचा भारताकडे मैत्रीचा हात
काश्मीरबरोबरच इतर सर्व मुद्दय़ांवर भारतासोबत असलेले वाद खेळीमेळीच्या वातावरणात मिटविण्याची इच्छा व्यक्त करताना पाकिस्तानने भारतासमोर मैत्रीचा हात केला आहे. सिंधू पाणी करार मोडून पाकिस्तानला पाणी न देण्याचा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर पाकिस्तानला उशिरा शहाणपण सुचले आहे.
काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधील सर्वाधिक वादाचा मुद्दा असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते नफीस झकारीया यांनी सांगितले. तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाने या दोन्ही देशांमधील हा दीर्घकालीन वाद मिटविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, असेही झकारिया यांनी म्हटले आहे. काश्मीरसह विविध वादाच्या मुद्दय़ांवर मैत्रीतून आणि खेळीमेळीच्या वातावरणात तोडगा काढावा हा आमचा प्रयत्न असल्याचे झकारिया म्हणाले. संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरबाबत केलेल्या ठरावाचे भारताकडून सातत्याने उल्लंघन करण्यात येत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असेही झकारिया यावेळी म्हणाले.
उरी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करारावरून कठोर भूमिका घेतली आहे. भारताने एकतर्फी हा करार डावलू नये, असेही झकारिया म्हणाले. जगातील कोणताही देश असा एकतर्फी करार डावलू शकत नाही. असे सांगून ते म्हणाले की, भारत आणि काश्मीरमधील विविध घडामोडींवर पाकिस्तानचे लक्ष आहे. भारताने हा करार डावलल्यास आम्हाला त्यावर तातडीने विचार करावा लागणार आहे.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान जखमी
उत्तर काश्मीरमध्ये बंदीपुरा जिल्ह्यात लष्करी जवानांची शोधमोहिम सुरू असताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन भारतीय जवान जखमी झाले.
हाजिन भागात शाहगुंड गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या भागात शोधमोहिम राबविली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. नाईक मदन सिंग आणि सिपाई एच. कृष्णा हे दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिंधु पाणी करार महत्त्वाचा
आमच्या दृष्टीने सिंधू पाणी करार अतिशय महत्त्वाचा आहे. भारताने मागील अनेक निर्णय चर्चेद्वारे सोडविले आहेत. त्यामुळे या कराराबाबतही खेळीमेळीच्या वातावरणात निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न असल्याचे, झकारिया म्हणाले. भारताने तडकाफडकी निर्णय घेतल्यास आम्हाला मोठा फटका बसेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही, असेही ते म्हणाले. रेडिओला दिलेल्या मुलाखतीत झकारिया यांनी ही माहिती दिली.