पीटीआय, नवी दिल्ली/ इस्लामाबाद

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी भारताने अटारी सीमा बंद केल्यामुळे दोन्ही देशांमधील उरलासुरला व्यापार व्यवहारही संपुष्टात आला. भारताने गुरुवारी आणखी कडक पावले उचलत वैद्याकीय उपचारांसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसाही रद्द केला असून त्यांना २७ एप्रिलपूर्वी भारत सोडण्याच्या सूचना दिल्या. पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सिंधु जलकरार स्थगित केल्याची अधिकृत माहितीही पाकिस्तान सरकारला भारताकडून गुरुवारी देण्यात आली.

सिंधु जलकरारातील तरतुदींचा भंग केल्याचे सांगत भारताने हा करार स्थगित करत असल्याचे गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला कळवले. सीमेच्या पलीकडील दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मीरला लक्ष्य करण्याची पाकिस्तानची कृती या कराराअंतर्गत नमूद केलेल्या भारताच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याने तो स्थगित करण्यात आल्याचे भारताने कळवले.

भारताने बुधवारी पाकिस्तानवर घातलेल्या निर्बंधांना पाकिस्ताननेही तशाच निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. त्यात अटारी सीमा बंद करण्यात आल्याने दोन्ही देशांतील व्यापार बंद झाला आहे. २०१९च्या पुलवामा हल्ल्यापासूनच भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा व्यापार नगण्य राहिला आहे. भारताच्या एकूण व्यापारात पाकिस्तानचा वाटा ०.०६ टक्के इतकाच असल्याचे भारतीय निर्यात संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष एस. सी. रल्हान यांनी सांगितले. यात प्रामुख्याने फळे, सुका मेवा, तेलबिया आणि गुणकारी वनस्पतींचा समावेश होतो. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या मालावर २०० टक्के शुल्क आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आताही पाकिस्तान भारताकडून मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यात रसायने, औषधे, कापूस, चहा, कॉफी, कांदे, टोमॅटो यांचा समावेश आहे. याशिवाय अटारी सीमेमार्गे अफगाणीस्तानशी होणाऱ्या व्यापारावरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारताने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा सरसकट रद्द केले. त्यामुळे भारतात वैद्याकीय उपचारांसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आता २९ एप्रिलपर्यंत आपल्या मायदेशी परतावे लागणार आहे. पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनाही तातडीने परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विमानसेवेला फटका

पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई हद्द बंद केल्याचा मोठा परिणाम भारतातील विमान वाहतुकीवर होण्याची चिन्हे आहेत. भारतातून पश्चिम आशिया, युरोप, उत्तर अमेरिका येथे ये-जा करणाऱ्या विमानांना आता वळसा घालून जावे लागणार असल्याने विमान प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी व्यक्त केली आहे. भारताने जाहीर केलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केल्याचे जाहीर केले. त्यानंतर टाटा समूहाच्या एअर इंडिया कंपनीने ‘एक्स’ संकेतस्थळावरून या बंदीच्या परिणामांची माहिती दिली.