हैदराबादचे खासदार आणि AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. भारताची फाळणी होणं ही ऐतिहासिक चूक होती. भारताची फाळणी व्हायला नको होती, मात्र दुर्भाग्याने असं घडलं आणि देशाची फाळणी झाली. जे व्हायला नको होतं असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. ओवैसी यांनी एका पत्रकाराला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू महासभेमुळे देशाची फाळणी झाली असं म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता ओवैसी यांनी ही उत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे ओवैसी यांनी?
“देशाची फाळणी होणं ही एक ऐतिहासिक चूक होती. देशाची फाळणी व्हायला नको होती. दुर्दैवाने हा निर्णय घेतला गेला आणि देशाचं विभाजन झालं. देशाची फाळणी कशी झाली याचं उत्तर मी सविस्तर देऊ शकतो. मात्र ही एक ऐतिहासिक चूक एवढं मी एका ओळीत सांगू शकत नाही. तुम्ही इंडिया विन्स फ्रिडम हे मौलाना आझाद यांचं पुस्तक वाचलं पाहिजे.” असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “मोहम्मद अली जिनांमुळे नाही तर हिंदू महासभेमुळे भारताची फाळणी.. “, सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचं वक्तव्य
मौलाना आझाद यांनीही देशाची फाळणी करुन स्वातंत्र्य स्वीकारु नका असं म्हटलं होतं. इंडिया विन्स फ्रिडम या पुस्तकात त्यांनी तसा उल्लेख केला आहे. सगळ्या काँग्रेस नेत्यांनी त्यांनी हे सांगितलं होतं की देशाची फाळणी होऊ देऊ नका.
काय म्हणाले होते स्वामी प्रसाद मौर्य?
“भारताची घटना हे सांगते की धर्म, जात, लिंग, जन्मस्थळ यांच्या आधारे कुठलाही भेदभाव करता येत नाही. जर कुणीही हिंदू राष्ट्र हवं अशी मागणी करत असेल तर दुसरे लोकही तशी मागणी करणार नाहीत का? जे हिंदू राष्ट्राची मागणी करत आहेत ते देशाचे शत्रू आहेत. याआधी हिंदू महासभेने हिंदू राष्ट्राची मागणी केली होती. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली.” असं वक्तव्य स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलं होतं. त्याविषयी विचारलं असता ओवैसी यांनी फाळणी ही एक ऐतिहासिक चूक होती असं म्हटलं आहे.