India in Asian Games 2023 : आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताने अनेक पदकांची लयलूट केली आहे. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांवर मोहोर उमटवून देशाची मान उंचावली आहे. विविध राज्यातील, विविध जिल्ह्यांतील, ग्रामीण – शहरी भागातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत सर्वोत्तम कामगिरी केली. या आशियाई क्रीडा स्पर्धेतील विविध क्रिडा प्रकारात भारताने पदके मिळवली आहेत. याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. तसंच, त्यांच्या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना असल्याचंही त्यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू केलेला खेलो इंडिया हा उपक्रम गेमचेंजर ठरला असल्याचं अमित शाह म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आशियाई क्रीडा स्पर्धा नुकतीच संपली. आपल्या सर्वांसाठी आनंदाचा विषय आहे की १०० पेक्षा जास्त पदके यंदा भारताने जिंकली आहेत. टोकिया ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक, कॉमन वेल्थसारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये २०१४ नंतर भारताने उत्तरोत्तर प्रगती केली आहे. याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदींनी खेळासाठी फक्त भाषणं केली नाहीत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिभाशाली ऍथलेटिक्सना शोधून त्यांना प्रशिक्षणाची सुविधा देऊन, त्यांच्या आहार स्वास्थ्याची काळजी घेतली. खेलो इंडिया हा उपक्रम गेम चेंजर ठरला आहे”, असं अमित शाह म्हणाले.

भारताला एकूण किती पदके?

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण १०७ पदके मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावली. यामध्ये २८ सुवर्णपदक, ३८ रौप्य पदक आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश आहे.

खेळाडूंवर अतिरिक्त ३ हजार कोटी खर्चाची तयारी

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमा अंतर्गत ३ हजारहून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण, वैद्यकीय, आहारविषयक मदत मिळत आहे. आजमितीला खेळाडूंना एकूण २५ हजार कोटी रुपयांची मदत मिळत आहे. यापुढे खेळाडूंच्या  मार्गात आर्थिक मदतीची अडचण राहणार नाही. देशातच अधिक दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आणि खेळाडूंवर सरकार अतिरिक्त ३ हजार कोटी रुपये खर्च करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी खेळाडूंना दिले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India played very well and the main reason is that pm modi searched for talented athletes everywhere says amit shah sgk