Mohammad Muizzu India Visit : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मालदीव आणि भारतामधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मोहम्मद मुइज्जू हे भारत दौऱ्यावर आहेत. मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीसंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, भारत-मालदीव या दोन्ही देशामधील संबंधांना पुढे नेण्याचं काम भारत करत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचे हैदराबाद हाऊस येथे आगमन झाल्यावर त्यांचे हार्दिक स्वागत केले. यावेळी भारत-मालदीव द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत चर्चा झाली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, “भारत आणि मालदीव या दोन्ही देशामधील संबंध शतकानुशतके जुने आहेत. भारत हा मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी देश आणि जवळचा मित्र आहे. आमच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि सागर व्हिजनमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान आहे. शेजारील देशाचे धोरण आणि सागर व्हिजन भारताने नेहमीच मालदीवसाठी प्रथम प्रतिसादाची भूमिका बजावली आहे. सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीमध्ये मालदीवने महत्वाचे व्हिजन स्वीकारले आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

हेही वाचा : राष्ट्रपतींच्या ‘त्या’ दौऱ्यावर भाजपा खासदाराचा आक्षेप; पतीच्या वडिलांची भेट न घेतल्याबद्दलही व्यक्त केली नाराजी! नेमकं प्रकरण काय?

“आज आम्ही परस्पर सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी दृष्टीकोन स्वीकारला आहे. विकासाची भागीदारी हा आमच्या संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि भारताने नेहमीच मालदीवच्या लोकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. भारताने नेहमी आपला शेजारी देश या नात्याने मालदीव बरोबर आपले कर्तव्य निभावले आहे. आज आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी आम्ही एकत्र काम करू. संस्थापक सदस्य म्हणून कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हमध्ये सामील होण्यासाठी मालदीवचे स्वागत आहे. एकता हार्बर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांच्या प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी आम्ही आमचे सहकार्य सुरू ठेवू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदींना मालदीवला भेट देण्याचे निमंत्रण

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी मोहम्मद मुइज्जू यांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली. यावेळी मोहम्मद मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींना मालदीवला भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी मोहम्मद मुइज्जू म्हणाले, “आमच्या नवीन सर्वसमावेशक व्हिजन डॉक्युमेंटमध्ये विकास, सागरी सुरक्षा, व्यापार भागीदारी, ऊर्जा प्रकल्प, आरोग्य इत्यादींचा समावेश आहे. मी पंतप्रधान मोदींना मालदीव भेटीसाठी आमंत्रित करू इच्छितो. मालदीवला दिलेल्या मदतीबद्दल, विशेषत: अलीकडील अर्थसंकल्पीय मदतीबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. मालदीवच्या गरजेच्या वेळी भारत त्यांच्या पाठीशी उभा राहिला”, असं मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं.