गेल्या तीन वर्षांत भारतात पोलिओचा एकही रुग्ण आढळला नसून जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. पोलिओमुक्तीचा आनंद सरकारी पातळीवर अधिकृतपणे साजरा करण्यासाठी ११ फेब्रुवारीचा मुहूर्त निवडण्यात आला असून त्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली खास समारंभ होणार आहे.
गेल्या तीन वर्षांत पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही, ही आपल्या सामूहिक अथक प्रयत्नांचीच फलश्रुती आहे. देशाचे हे सर्वात मोठे यश आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी सांगितले.
२००९मध्ये जगातील एकूण पोलिओ रुग्णांपैकी निम्मे रुग्ण भारतात होते! अवघ्या साडेचार वर्षांत आपण संपूर्ण देश पोलिओमुक्त केला आहे. ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे, असेही आझाद म्हणाले.
पोलिओचे उच्चाटन झाल्यानिमित्त ११ फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यक्रमास राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या निमंत्रक सोनिया गांधी, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक मार्गारेट चॅन उपस्थित राहणार आहेत.
देशात पोलिओ नसला तरी लगतच्या देशांतून येणाऱ्या पर्यटकांमुळे त्याची लागण पुन्हा होऊ शकते. या धोक्याबाबत विचारता आझाद म्हणाले की, पाकिस्तानात पोलिओचे प्रमाण चिंताजनक आहे. म्हणून तेथून भारतात येणाऱ्या मुलांना आधी पोलिओचा डोस देणे अनिवार्य केले गेले आहे. अन्य काही देशांतील मुलांनाही हाच नियम लागू आहे.
साथीपायी फैलावत नसलेल्या, पण देशात मोठय़ा प्रमाणात पसरलेल्या कर्करोग आणि मधुमेहाला आटोक्यात आणण्यावर आता आरोग्य विभागाचा भर असेल, असेही आझाद यांनी स्पष्ट केले.
१९८८मध्ये १२५ देशांत पोलिओने ग्रासलेल्या वा मृत्यू पावलेल्यांची संख्या साडेतीन लाख होती. संयुक्त राष्ट्रांनी त्याच वर्षी पोलिओनिवारणाचा जागतिक कार्यक्रम हाती घेतला होता. तेव्हापासून या प्रमाणात ९९ टक्के घट झाली आहे.

बिग बी आनंदी
या वर्षअखेर भारताच्या पोलिओमुक्तीवर शिक्कामोर्तब होईल, अशी चिन्हे आहेत. या एका महत्त्वाच्या राष्ट्रीय आंदोलनात मला सहभागी होता आले, याचा आनंद वाटतो. आता मी संयुक्त राष्ट्रांच्या स्त्रीभ्रूणहत्याविरोधी मोहिमेसाठी काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया पोलिओमुक्ती आंदोलनात मोठा वाटा असलेले अमिताभ बच्चन यांनी गेल्याच आठवडय़ात फेसबुकवरून व्यक्त केली होती.

देशातील पोलिओची अखेरची नोंद
१३ जानेवारी २०११ रोजीची आहे. पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्य़ात एका अडीच वर्षे वयाच्या मुलीला पोलिओ झाल्याचे निदान झाले होते. पोलिओच्या रुग्णांची संख्या २००९मध्ये ७४१, २०१०मध्ये ४२, तर २०११मध्ये अवघी एक एवढी होती.

Story img Loader