गेल्या तीन वर्षांत भारतात पोलिओचा एकही रुग्ण आढळला नसून जागतिक आरोग्य संघटनेने भारत पोलिओमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. पोलिओमुक्तीचा आनंद सरकारी पातळीवर अधिकृतपणे साजरा करण्यासाठी ११ फेब्रुवारीचा मुहूर्त निवडण्यात आला असून त्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली खास समारंभ होणार आहे.
गेल्या तीन वर्षांत पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही, ही आपल्या सामूहिक अथक प्रयत्नांचीच फलश्रुती आहे. देशाचे हे सर्वात मोठे यश आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी सांगितले.
२००९मध्ये जगातील एकूण पोलिओ रुग्णांपैकी निम्मे रुग्ण भारतात होते! अवघ्या साडेचार वर्षांत आपण संपूर्ण देश पोलिओमुक्त केला आहे. ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे, असेही आझाद म्हणाले.
पोलिओचे उच्चाटन झाल्यानिमित्त ११ फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यक्रमास राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या निमंत्रक सोनिया गांधी, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक मार्गारेट चॅन उपस्थित राहणार आहेत.
देशात पोलिओ नसला तरी लगतच्या देशांतून येणाऱ्या पर्यटकांमुळे त्याची लागण पुन्हा होऊ शकते. या धोक्याबाबत विचारता आझाद म्हणाले की, पाकिस्तानात पोलिओचे प्रमाण चिंताजनक आहे. म्हणून तेथून भारतात येणाऱ्या मुलांना आधी पोलिओचा डोस देणे अनिवार्य केले गेले आहे. अन्य काही देशांतील मुलांनाही हाच नियम लागू आहे.
साथीपायी फैलावत नसलेल्या, पण देशात मोठय़ा प्रमाणात पसरलेल्या कर्करोग आणि मधुमेहाला आटोक्यात आणण्यावर आता आरोग्य विभागाचा भर असेल, असेही आझाद यांनी स्पष्ट केले.
१९८८मध्ये १२५ देशांत पोलिओने ग्रासलेल्या वा मृत्यू पावलेल्यांची संख्या साडेतीन लाख होती. संयुक्त राष्ट्रांनी त्याच वर्षी पोलिओनिवारणाचा जागतिक कार्यक्रम हाती घेतला होता. तेव्हापासून या प्रमाणात ९९ टक्के घट झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा