अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माझं जे स्वागत केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसंच आज माझं जे स्वागत झालं ते स्वागत माझं एकट्याचं नाही तर अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांचा आणि भारताच्या १४० कोटी जनतेचा गौरव आहे. आपली मैत्री ही अशीच वाटचाल करते आहे यापुढेही असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडन यांना उद्देशून म्हटलं आहे. व्हाईट हाऊस या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाही मानणारे आणि We The People हे सूत्र मानणारे आहेत असंही मोदींनी म्हटलं आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
“३० वर्षांपूर्वी मी अमेरिकेत आलो होतो. त्यावेळी मी व्हाईट हाऊस बाहेरुन पाहिलं होतं. मी भारताचा पंतप्रधान झाल्यानंतर काहीवेळा या ठिकाणी येणं झालं. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय आणि अमेरिकन समुदाय या ठिकाणी जमला आहे. त्यांच्यासाठी व्हाईट हाऊसचे दरवाजे उघडले गेले आहेत याचा विशेष आनंद झाला आहे.”
भारतीय समुदायाचे लोक टॅलेंटेड
“भारतीय समुदायाचे लोक आपलं टॅलेंट, कर्मठता आणि निष्ठेने अमेरिकेत भारताची शान वाढवत आहेत. तुम्ही सगळे लोक आमच्या संबंधांची खरी ताकद आहात. आज तु्म्हाला सन्मान मिळाला त्यासाठी मी जो बायडन आणि जील बायडन यांचे आभार मानतो. तुम्हा दोघांचे यासाठी जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.”
We The People चा मोदींचा नारा
“भारत आणि अमेरिका दोन्ही देशातले समाज हे लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत. दोन्ही देशांच्या घटना आणि त्यांचे तीन शब्द We the People असे आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना त्यांच्या विविधतेचा अभिमान आहे. आम्ही सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहोत.”
आणखी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
कोव्हिड काळ संपल्यानंतर जग एका नव्या दिशेला जातं आहे. या कालखंडात भारत आणि अमेरिकेची मैत्री जगाचं सामर्थ वाढवण्यासाठी पुरक ठरणार आहे. जागतिक स्तरावर चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून वैश्विक शांती, स्थैर्य आणि समृद्धता यासाठी काम करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. दोन्ही देशांचं एकत्र असणं हे जगात लोकशाही सुदृढ करण्यासाठी नक्कीच सहाय्य करणारं ठरणार आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
काही वेळातच राष्ट्राध्यक्ष बायडन आणि मी भारत-अमेरिका संबंध आणि इतर वैश्विक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करु. आजही आमची चर्चा सकारात्मक असणार आहे. आज दुपारी मला US काँग्रेसला संबोधित करण्याचा सन्मान मिळणार आहे. माझी आणि १४० भारतीयांची हीच इच्छा आहे की भारताचा तिरंगा आणि अमेरिकेचा स्टार असलेला ध्वज हे नव्या उंचीवर फडकत राहोत. जो बायडेन आणि जील बायडेन यांचे मी आभार मानतो जय हिंद