RBI Governor Sanjay Malhotra on US Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर आयात शुल्क लादले आहे. कमीतकमी १० टक्क्यांपासून हे आयात शुल्क असून प्रत्येक देशासाठी विविध कर लादण्यात आले आहे. यामुळे अनेक देशातील अनेक कंपन्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून जगात व्यापार युद्धाची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही संभाव्य परिस्थिती टाळण्याकरता भारत अमेरिकन प्रशासनाशी संवाद साधत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. चलनविषय धोरण समितीने घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना ते बोलत होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे संजय मल्होत्रा म्हणाले, “जागतिक वृद्धीचा विकासावर होणाऱ्या परिणामाचे मोजमाप करणे सध्या कठीण आहे. धोरणात्मक भरपाईचा विचार करून निर्णय घेण्यासाठी जागतिक आर्थिक दृष्टिकोन वेगाने बदलत आहे. अलिकडच्या व्यापार शुल्कामुळे अनिश्चितता वाढली आहे. यामुळे सर्व क्षेत्रातील आर्थिक परिस्थितीवर अंधुक परिणाम झाला आहे, यामुळे जागतिक वाढ आणि चलनवाढीसाठी नवीन अडथळे निर्माण झाले आहेत. या अशांततेच्या दरम्यान अमेरिकन डॉलर लक्षणीयरीत्या कमकुवत झाला आहे”, असं त्यांनी सांगितले.
“जागतिक व्यापार आणि धोरणात्मक अनिश्चितता विकासाला अडथळा आणतील, परंतु देशांतर्गत विकासाचे व्यवस्थापन करण्याबाबत कोणतीही चिंता नाही”, असं म्हणत त्यांनी नागरिकांना दिलासाही दिला.
रेपो रेटमध्ये कपात
रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने (MPC) ९ एप्रिल रोजीच्या धोरण आढाव्यात रेपो दर २५ बेसिस पॉइंट्स (bps) ने कमी करून ६ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत गृह, वैयक्तिक, वाहन आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. दर निश्चित करणाऱ्या पॅनेलने चलनविषयक धोरणाची भूमिका तटस्थवरून अनुकूल अशी केल्याने रेपो दरात कपात करण्यात आली. तर, एमपीसीने २०२५-२६ मध्ये जीडीपी वाढ ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५-२६ मध्ये किरकोळ महागाई ४ टक्के राहण्याची अपेक्षा असल्याचंही एमपीसीने म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कर लादल्याने जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अनिश्चितता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सहा सदस्यीय एमपीसीने हा निर्णय घेतला. उच्च कर दरांमुळे महागाई, व्यापार तणाव वाढण्याची आणि जागतिक अर्थव्यवस्थेत घट होण्याची भीती असल्याने दर कपात करण्यात आली आहे.