सविता हलप्पनवार या महिलेच्या मृत्यूप्रकरणी भारताने शुक्रवारी आर्यलडकडे कडक निषेध नोंदवला. परराष्ट्र मंत्रालयाने आर्यलडचे राजदूत फेलिम मॅक्लॉघ्लिन यांना पाचारण करून त्यांच्याकडे या प्रकरणी निषेध व संताप व्यक्त केला. या प्रकरणाची तपशीलवार चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही भारताने दिले आहेत.
आर्यलडमध्ये राहणाऱ्या सविता हलप्पनवार या व्यवसायाने दंतवैद्यक होत्या. त्यांना गर्भपात करून हवा होता. मात्र, आर्यलड हा कॅथॉलिक देश असून तेथे गर्भपात निषिद्ध मानले जात असल्याचे कारण पुढे करत डॉक्टरांनी त्यांच्या गर्भपाताला नकार दिला होता. त्यामुळे शरीरात विष पसरून सविता यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सविताचे पती प्रदीप यांनी आयरिश पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे पडसाद भारतातही उमटले.
मॅक्लॉघ्लिन यांनी या प्रकरणी आयरिश सरकार भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सविता मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून आर्यलडमधील भारतीय दूतावासाकडे त्यासंदर्भात तपशीलवार अहवाल सादर केला जाईल व दोषींवर कारवाई केली जाईल, असेही या राजदूताने स्पष्ट केले.

Story img Loader