नवी दिल्ली : अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याची प्रक्रिया करताना त्यांच्याशी गैरवर्तणूक करण्यात आल्याबाबत भारताने अमेरिकेकडे चिंता नोंदवली. स्थलांतरितांच्या हाता-पायात बेड्या घालण्याचा प्रकार टाळता आला असता, अशी टिप्पणी भारताने शुक्रवारी केली.

अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू करण्यात आली. ‘सी-१७’ या अमेरिकी लष्कराच्या विमानातून टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून १०४ स्थलांतरितांना भारतात परत पाठविण्यात आले. पंजाबमधील अमृतसर येथे सोडलेल्या या स्थलांतरितांच्या हाता-पायात बेड्या घातलेल्या होत्या. भारतीय स्थलांतरितांना अशा प्रकारची गैरवागणूक दिल्याने संसदेत गुरुवारी विरोधी पक्षांनी गोंधळ घातला आणि भारताने अमेरिकेला जाब का विचारला नाही, असा सवाल केला.

विरोधकांच्या आरोपानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी टिप्पणी केली आणि भारताने अमेरिकेकडे याबाबत चिंता व्यक्त केल्याचे सांगितले. ‘‘आम्ही आमच्या भावना व चिंता अमेरिकेला कळविल्या आहेत. अशा प्रकारचा गैरव्यवहार टाळता येऊ शकत होता, असे अमेरिकेला सांगितल्याचे मिसरी यांनी सांगितले. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून ४८७ भारतीय नागरिकांना हद्दपार करण्याचे अंतिम आदेश आहेत आणि २९८ जणांचे तपशील भारताला दिले आहेत. या माहितीची पडताळणी केली जात असल्याचे मिसरी यांनी सांगितले.

बेकायदा स्थलांतरितांना निर्बंध घालण्याचे अमेरिकेचे धोरण २०१२ पासून लागू आहे, असे मिसरी यांनी सांगताच २०१२ मध्ये स्थलांतरितांना बेड्या ठोकल्याबद्दल भारताने त्यावेळी निषेध नोंदवला होता का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मात्र त्यावेळी अशा प्रकारचा निषेध नोंदविल्याची कोणतीही नोंद नाही, असे मिसरी म्हणाले.

भारतीयांना बेकायदा परदेशी पाठवणाऱ्या दलांची चौकशी

नोकरी किंवा इतर कारणांमुळे भारतीयांना अमेरिकेत पाठवणाऱ्या दलालांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. भारतीयांना कॅनडाच्या महाविद्यालयांमध्ये बोगस प्रवेशाद्वारे अमेरिकेत बेकायदा प्रवेश करण्यास मदत केली जाते. त्यामुळे यासंबंधी भारत, कॅनडा व अमेरिकेतील दलालांची चौकशी केली जाणार असल्याचे ईडी अधिकाऱ्याने सांगितले. मनी लाँडरिंगविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ८५०० हून अधिक चलन व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. परदेशात निधी पाठवण्यास मदत करणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय वित्तीय कंपन्याही ईडीच्या चौकशीच्या कक्षेत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान १२ फेब्रुवारीपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारीपासून अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुकव्रारी सांगितले. मोदींचा दौरा भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांना आणखी गती आणि दिशा देईल, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितले.

Story img Loader